
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित दादांचे जाणे हे केवळ पवार कुटुंबाचेच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
भास्कर जाधव यांनी शोक व्यक्त करताना नियतीच्या क्रूरतेवर प्रश्न उपस्थित केला. टिव्हीवर ही बातमी पाहिली तेव्हा नियती इतकी कठोर कशी असू शकते, असा प्रश्न मनात आला. अजित पवार एक अत्यंत कर्तव्यकठोर, शब्दाचे पक्के आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे नेतृत्व होते. दिवसाचे 24 तास देखील कामासाठी कमी पडतील इतक्या वेगाने काम करण्याची त्यांची पद्धत सर्वांनाच थक्क करणारी होती. भास्कर जाधव पुढे म्हणाले की, अजित दादा हे अत्यंत रोखठोख व्यक्तीमत्व होतं. अजित दादा कामशी होते मात्र तितकेच मनाने हळवे देखील होते आणि तितकेच शब्दाचे पक्के देखिल होते. आज ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत. मी त्यांच्यासोबत आय़ुष्यातील पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केलेले आहे आणि त्याच बरोबर विधीमंडळामध्ये जवळजवळ 34 वर्षे मी त्यांना जवळून बघितलेले आहे. त्यांना अनुभवलेले आहे, त्यांचा स्वभाव, त्यांच्या वागण्याची पद्धत, काम करण्याची हातोटी मी जवळून अभ्यासलेली देखील आहे. अजित दादा आपल्या सर्वांमधून जाण्यात नुकसान फक्त पवार कुटुंबियांचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे झाले आहे.
पक्ष कोणताही असला तरी, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अजित दादांनी एकदा तरी मुख्यमंत्री व्हावे, असा एक कोपरा होता. स्वतः दादांचेही हे स्वप्न होते, मात्र एका दुर्दैवी अपघातात ही सर्व स्वप्ने धुळीस मिळाली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आज अजित दादा आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. याचा प्रचंड असा धक्का तर आहेच. पण अतिव दु:ख होत आहे. माननीय अजित दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी माझ्या जाधव कुटुंबीयांच्या वतीने, विधिमंडळ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.





























































