नाटय़क्षेत्रातील मूक-नायक ‘बुकिंग क्लार्क’

मराठी रंगभूमी नव्या जोमाने बहरून आलीय. नवीजुनी नाटकं आणि नवनवे प्रयोग व यांच्या जोडीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतोय. काही नाटकं हाऊसफुल गर्दी खेचतायत. या सर्वात नाटय़गृहावरचा तो बुकिंग क्लार्क मात्र दुर्लक्षित आहे. नाटकांच्या नामावलीत त्याचे कुठेच नाव नसते.

नाटकाच्या बुकिंग ओपनिंगपासून ते करंट बुकिंगपर्यंत सगळ्या तिकिटांचा चोख हिशोब ठेवून निर्मात्यांचा नफा होईल हे पाहणारा, पाहुणे आणि निमंत्रितांची तिकिटे राखून ठेवणारा, कमी-अधिक झालेल्या तिकिटांना पर्याय देणारा आणि हे सर्व करूनही ऑनलाईन बुकिंगमुळे खिडकीवर तिकीट न मिळाल्याने आलेल्या प्रेक्षकांचा रोष ओढवून घेणारा हा नाटय़क्षेत्रातील अनेक मूकनायकांपैकी एक. तो नाटय़निर्माता आणि प्रेक्षक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असला तरी त्याला अत्यल्प मोबदला मिळतो. पंत्राटी काम असल्याने इतर कुठल्याही सोयीसुविधा त्याला नसतात. तरीही रोज सकाळी हसतमुखाने नाटय़गृहावर येऊन सलग 12 तास राबणाऱ्या या मानवाचे काwतुक करायलाच हवे.

विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात ही सेवा देणाऱ्या चंद्रकांत मुरमुरे, अरुण राणे, अनिल हळणकर, मधुकर धसाडे आणि महेश पावसकर यांच्या कामाची ही विशेष प्रातिनिधिक नोंद. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक नाटय़गृहांत ही सेवा देणाऱ्या तमाम बुकिंग दादांना आमचा सलाम!