
परळ एसटी आगाराच्या प्रवेशद्वाराला खेटून असलेल्या ‘ठसका’ शिवभोजन केंद्राने भाडय़ाचे 1 कोटी 88 लाख रुपये थकवले आहेत. हे भाडे वसूल करण्यासाठी एसटी महामंडळाकडून दर दोन महिन्यांनी नोटिसा पाठवल्या जात आहेत. शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या बचत गटाने हे भाडे थकवले असल्याने अद्याप कारवाई झालेली नाही. कामगारांवर कारवाईचा दट्टय़ा उगारणाऱ्या परिवहन मंत्र्यांचे ‘ठसका’कडे दुर्लक्ष कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी परळ एसटी आगाराला भेट दिली होती. त्यांना काही ठिकाणी दारूच्या बाटल्या आढळल्या. त्यावर त्यांनी मद्यपि कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे परिवहन मंत्र्यांच्या ‘पक्षपाती’ भूमिकेचा मुद्दा समोर आला आहे. 2021मध्ये सरवणकर यांच्याशी संबंधित हिरकणी बचत गट आणि राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टला ‘ठसका’ हे केंद्र चालवण्यासाठी परवानगी दिली होती. जवळपास 3 हजार चौरस फूट जागेवर उभारलेल्या केंद्राचा परवाना सन 2024पर्यंत होता. परवान्याची मुदत संपल्यानंतरही त्याचे नूतनीकरण झालेले नाही. आतापर्यंत भाडय़ापोटी 1 कोटी 88 लाख तर मालमत्ता व इतर करांपोटी 25 ते 29 लाखांची रक्कम थकीत आहे.
आता विशेष योजने अंतर्गत तडजोडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यात तोडगा न निघाल्यास बचत गटाविरुद्ध निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे खटला दाखल केला जाईल, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
नाव ‘शिवभोजन’, पण मिळते मच्छी, चिकन!
पाच वर्षांपूर्वी एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी उघडलेल्या ‘शिवभोजन’ केंद्रात सध्या सुरमई तंदुरी, स्टप पापलेट फ्राय, चिकन रुदाली कबाब, चिकन सिपंदरा कबाब असे मच्छी-चिकनचे विविध मेन्यू मिळत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या ‘शिवभोजन’ची सेवा बंद ठेऊन आणि भाडे थकवूनही बचत गटावर कठोर कारवाई करण्याबाबत परिवहन खाते ढिम्म आहे.


























































