
महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्राच्या राजकारणात अजितदादांचा शब्द अंतिम मानला जायचा. त्यांची इतकी दहशत. इतका दरारा होता की, तो प्रत्येकाला हवाहवासा वाटायचा. कारण तो दरारा खेळाडूंना दाबणारा नव्हे तर व्यवस्थेला शिस्तीत आणणारा होता. आज कबड्डीची दादागिरी संपलीय. त्यांच्या निधनाने कबड्डीपटू, कबड्डी संघटक आणि कबड्डीप्रेमी आज अनाथ झालेत, अशा शब्दांत आज प्रत्येक कबड्डीवाल्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या निधनामुळे कबड्डी-खोखोच नव्हे तर अवघ्या क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राची कबड्डी मजबूत झाली, सक्षम झाली, श्रीमंत झाली. त्यांच्या रूपाने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेलाही अध्यक्ष लाभले होते. ते खो-खो संघटनेचेही कर्णधार होते. ते खर्या अर्थाने मैदानातले कर्णधार (अध्यक्ष) होते, अशी भावनिक प्रतिक्रिया ज्येष्ठ कबड्डीपटू राणाप्रताप तिवारी यांनी व्यक्त केली. ते खूर्चीवर बसून खेळ बघणारे नव्हते. ते मैदानावर उतरून डाव ठरवणारे होते. कुठे निधी जायचा, कुठे थांबायचा, कुठे शिस्त लावायची हे निर्णय ते फाईल उघडण्याआधीच घ्यायचे. कबड्डीत काही झालं की आम्ही त्यांच्याकडेच धावायचो. आमची आपापसांत सुरू असलेली भांडणं-वाद यापुढे कोण सोडवणार, याची आतापासूनच काळजी वाटतेय, असेही तिवारी म्हणाले.
खेळाडूंचा आश्रयदाता हरपला
दादांच्या जाण्याने आम्ही आमच्या कुटुंबातील एक वडीलधारी व्यक्ती गमावलीय. खेळ आणि खेळाडूंना आश्रयदाता गमावलाय. गेली 25-30 वर्षे दादांशी अनेक क्रीडा संस्थाच्या माध्यमातून संपर्क येत होता. खेळाची जाण असलेला आणि खेळ आणि खेळाडूंना मानसन्मान मिळवून देणारा नेता नव्हे नेतृत्व आम्ही गमावलेय. – संजय शेटे,सरचिटणीस, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना
खेळाचे तारणहार गेले
महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रातील देशी खेळांचे विशेष करून खो–खो, कबड्डी, कुस्ती या खेळाचे अजितदादा हे तारणहार होते. त्यांच्या पाठिंब्यामुळे देशी खेळांना बळ लाभले. पण त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा जगताची अपरिमित हानी झाली आहे. देशी खेळ पोरके झाले आहेत. अशा या उत्तुंग नेतृत्वास भावपूर्ण श्रद्धांजली. -चंद्रजीत जाधव (प्रमुख कार्यवाह, राज्य खो-खो संघटना)






























































