
हिंदुस्थानात सुरक्षेचे कारण पुढे करत आगामी टी20 विश्वकपमधून माघार घेणाऱया बांगलादेश सरकारचा दुटप्पीपणा आता उघड झाला आहे. क्रिकेटसाठी हिंदुस्थान असुरक्षित ठरवणाऱया बांगलादेश सरकारने त्याच हिंदुस्थानात आशियाई रायफल व पिस्तूल नेमबाजी स्पर्धेसाठी आपला संघ पाठवण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे दुहेरी मापदंड स्पष्टपणे समोर आले आहेत.
माध्यम अहवालांनुसार, बांगलादेश सरकारने पुढील महिन्यात नवी दिल्ली येथे होणाऱया आशियाई रायफल व पिस्तूल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय संघाला अधिकृत मंजुरी दिली आहे. युवक व क्रीडा मंत्रालयाने सरकारी आदेश काढून 2 ते 14 फेब्रुवारीदरम्यान होणाऱया स्पर्धेसाठी हिरवा पंदील दाखवला. विशेष म्हणजे, याच आधी सुरक्षेचे कारण देत बांगलादेशने टी–20 विश्वकपसाठी क्रिकेट संघाचा हिंदुस्थान दौरा रद्द केला होता.
सरकारी अधिकाऱयांच्या मते ही स्पर्धा बंदिस्त ठिकाणी होणार असल्याने कोणताही धोका नाही. संघात फक्त एक नेमबाज आणि एक प्रशिक्षक असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. आयोजकांनीही सुरक्षेची हमी दिल्याचे सांगण्यात आले. मात्र हा युक्तिवाद ऐकून एकच प्रश्न उभा राहतो की सुरक्षा खरंच कारण आहे की केवळ सोयिस्कर कारण? या स्पर्धेत बांगलादेशकडून देशाचा अव्वल नेमबाज रबीउल इस्लाम सहभागी होणार असून सोबत प्रशिक्षक शारमिन अख्तर असतील. टी–20 वर्ल्ड कपमधून माघार घेतल्यानंतर आयसीसीने बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला स्थान दिले आहे.


























































