
आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपले विजेतेपद टिकवण्याची संपूर्ण क्षमता हिंदुस्थानी संघात आहे. तो सलग दोनदा वर्ल्ड कप जिंकण्याचा इतिहास घडवू शकतो, असा विश्वास माजी कर्णधार अनिल कुंबळेने व्यक्त केला आहे. मात्र टी–20 सारख्या वेगवान प्रकारात सलग दोन वेळा विश्वविजेते होणे अवघड असते, हेही त्याने आवर्जून सांगितले. 7 फेब्रुवारीपासून हिंदुस्थानात सुरू होणाऱया या क्रिकेट युद्धात यजमान हिंदुस्थानला प्रबळ दावेदार मानले जात आहे.
एका खासगी वाहिनीच्या चर्चेत ‘सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान स्पर्धेत खूप पुढे जाऊ शकतो. टी-20 विश्वचषकात आजवर कोणालाही विजेतेपदाचा बचाव करता आलेला नाही. त्यामुळे हिंदुस्थानसमोर इतिहास घडवण्याची मोठी संधी आहे. संघाचा सध्याचा फॉर्म, संतुलन आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची ताकद पाहता किमान उपांत्य फेरी गाठणे अपेक्षित आहे. त्यानंतर सर्व काही त्या दिवसाच्या कामगिरीवर अवलंबून असेल,’ असे अनिल कुंबळेने सांगितले.
गट ‘अ’ मध्ये हिंदुस्थानला अमेरिका, नामीबिया, नेदरलॅण्ड्स आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाखाली हिंदुस्थान अजिंक्य वाटचाल करत आहे आणि आता लक्ष्य एकच, विजेतेपद कायम राखण्याचे!


























































