टॉप टेनमध्ये सूर्यकुमार परतला

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांच्या यादीत परतला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसाच्या ताज्या टी-20 क्रमवारीत सूर्यकुमारने पाच स्थानांची झेप घेत सातवा क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत हिंदुस्थान सध्या 3-0 अशी आघाडीवर असून, या यशामागे सूर्यकुमारच्या दमदार फलंदाजीचा मोठा वाटा आहे.

टी-20 फॉरमॅटमध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करत असल्याची टीका झेलणार्या सूर्यकुमारने दुसर्या टी-20 सामन्यात 82 धावांची खेळी साकारली. या खेळीसह त्याने तब्बल 468 दिवसांपासून सुरू असलेला अर्धशतकाचा दुष्काळही संपवला. त्यानंतरच्या सामन्यातही त्याने आपली लय कायम राखत अवघ्या 26 चेंडूंमध्ये 57 धावा करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

हिंदुस्थानचा सलामीवीर अभिषेक शर्मानेही तिसऱ्या टी-20 सामन्यात 68 धावांची तडाखेबंद खेळी करत आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. 929 गुणांसह तो फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, त्याने प्रतिस्पर्ध्यांवरील आघाडी तब्बल 80 गुणांपर्यंत वाढवली आहे.

गोलंदाजीतही जसप्रीत बुमराने तिसऱया टी-20 सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध तीन विकेट घेत गोलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांची झेप घेत तेरावा क्रमांक गाठला आहे. त्याचवेळी फिरकीवीर वरुण चक्रवर्तीने आपल्या भेदक माऱयामुळे गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही हिंदुस्थानचे वर्चस्व कायम आहे. हार्दिक पंड्याने सध्याच्या मालिकेतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे एक स्थान प्रगती करत तिसरा क्रमांक मिळवला आहे, तर शिवम दुबेने पाच स्थानांची झेप घेत अकरावा क्रमांक पटकावला आहे.