
उपमुख्यमंत्री तथा बीड जिह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी येताच बीडवर शोककळा पसरली. दीड वर्षापासून अजित पवार हे बीड जिह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत होते. अलीकडेच त्यांनी अनेक प्रकल्प राबवायला सुरुवात केली होती. बीड जिह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या जाण्याने बीड जिह्याची मोठी हानी झाली. संपूर्ण जिह्यामध्ये स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानूष हत्येनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर बीडचे पालकत्व अजितदादा पवार यांनी स्वीकारले. जबाबदारी स्वीकारताच त्यांनी सर्वात अगोदर पोलीस प्रशासनाला निर्भयपणे काम करण्याची मुभा दिली. त्यामुळे जिल्हय़ातील गुंडगिरीवर बराच वचक बसला. पालकमंत्री म्हणून त्यांनी दीड वर्षांच्या काळात अनेक कामे मार्गी लावली. दादांच्या निधनाची बातमी येताच बीड शोकसागरात बुडाले.






























































