
आमची पिंकी प्रचंड कष्टाने शिकली होती. ती क्रू मेंबर म्हणून यशस्वीपणे कर्तव्य बजावत होती. या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱया; परंतु आर्थिक अडचणीमुळे ज्यांना समस्या येतात अशा होतकरू तरुण-तरुणींना मोफत मदतीचा हात द्यायचा. त्यांना आपल्या परीने शिकवायचे, ट्रेनिंग द्यायचे असे स्वप्न पिंकीचे होते. मंगळवारी रात्री आमचे शेवटचे बोलणे झाले तेव्हा तिने हे विचार माझ्याकडे मांडले, पण आज ही दुर्घटना घडली. आमच्या पिंकीचे स्वप्न अधुरे राहिले असे सांगताना पिंकीचा लहान भाऊ करण माली याच्या अश्रूंचा बांध फुटला.
प्रभादेवी येथील गोपाळ नगरात पिंकी लहानाची मोठी झाली. अत्यंत कष्टाने ती बारावीपर्यंत शिकली. मग प्रशिक्षण घेऊन ती विमान कंपनीत रुजू झाली. गेल्या अनेक वर्षांपासून ती उत्तमरीत्या काम करत होती. दोन विमान कंपनीत तिने काम केले. दरम्यानच्या काळात तिचा एक दुचाकी अपघात झाला होता, पण त्यातूनही ती ठीक झाली. मग ती मुलांना ट्रेनिंग द्यायची. त्यानंतर तिला व्हीएसआर एअरलाईन्स कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. अजित पवार यांनी व्हीएसआरच्या खासगी विमानातून चार वेळा प्रवास केला तेव्हा माझी बहीण क्रू सदस्य म्हणून त्या विमानावर कार्यरत होती. ती उत्तमरीत्या काम करत होती. वर्ष 2021 मध्ये सोमवीकर सैनी यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर ती कळव्याच्या विटावा येथे स्थायिक झाली होती. तिच्या आयुष्यात ती आनंदी होती. आता चांगल्या ठिकाणी मी काम करतेय, अपार कष्टाने इथपर्यंत पोहचली आहे. आपण संघर्ष केलाय, मात्र ज्या तरुण-तरुणींना या क्षेत्रात भविष्य घडवायचे आहे, परंतु केवळ आर्थिक बाबीमुळे त्यांना समस्या येत आहेत अशांना मी मोफत शिक्षण देईन, त्यांना आवश्यक बाबींची माहिती, प्रशिक्षण द्यायची माझी इच्छा आहे. आणि नक्कीच मी हे पुढे जाऊन करणार, अशी भावना पिंकीने मंगळवारी रात्री माझ्याशी मोबाईलवर बोलताना व्यक्त केली होती. पण नियतीच्या मनात काही भलतंच होतं. रात्री 10 वाजता आमचे बोलणे झाले आणि आज सकाळी काळाने तिच्यावर घाला घातला. आमच्यापासून तिला हिरावून घेतले, असे पिंकी माली सैनी हिचा लहान भाऊ करण माली याने सांगितले.
ती बोलली होती…
व्हीएसआरचे पायलट चांगले नाहीत. ते त्यांचे काम व्यवस्थित करत नाहीत, असे ताई बोलली होती; पण याबाबत तिने कोणाकडे कधी तक्रार केली नाही. अखेर आज ही दुर्घटना घडलीच, असे करण याने सांगितले.





























































