अजितदादा अनंतात विलीन; बारामतीत लोटला लाखोंचा जनसागर, अवघा महाराष्ट्र हेलावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात लाखोंच्या जनसागराच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी मानवंदना देऊन आकाशात बंदुकीच्या तीन फैरी झाडल्या. थरथरत्या हातांनी, साश्रुनयनांनी मुलगा पार्थ आणि जय पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अजितदादा अनंतात विलीन झाले. यावेळी आक्रोश, हुंदके आणि एकच वादा अजितदादा’, ‘अजितदादा परत या’, ‘अजितदादा अमर रहेच्या घोषणा देत आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यात आला.

 

आज पहाटे बारामती मेडिकल कॉलेज येथून काटेवाडी येथील निवासस्थानी अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. तिथून अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठान येथे निघाली. अंत्ययात्रेतही प्रचंड गर्दी लोटली होती. ‘अजितदादा अमर रहे’ अशा घोषणांनी अवघे आसमंत या वेळी दणाणून गेले.  

शरद पवार स्तब्ध…. निःशब्द

शरद पवारांचे बोट धरून अजितदादा राजकारणात आले. राजकारणाची बाराखडी त्यांनी शरद पवारांकडून गिरवली. दादांसाठी शरद पवार पितृतुल्य होते. मुलासमान पुतण्याचं असं अकाली जाणं हा शरद पवारांसाठी खूप मोठा आघात आहे. आज अंत्यसंस्कारावेळी शरद पवार स्तब्धनिःशब्द होते. येणाऱ्या प्रत्येकाला हात जोडून नमस्कार करत होते. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्याने सर्वांचेच मन हेलावून गेले.

दुःखाचा डोंगर कोसळलेल्या अजितदादांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी धीर दिला.

पवार कुटुंबाला शोक अनावर

अजितदादांच्या पार्थिवावरील तिरंगा पोलिसांनी पवार कुटुंबीयांकडे स्वाधीन केला. त्यानंतर वेद मंत्रोच्चारामध्ये शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रतापराव पवार उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी अंत्यदर्शन घेतले. पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी आईला आधार दिला. श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, सदानंद सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार, ओमराजे निंबाळकर, राणा जगजितसिंह पाटील आदी पवार कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यांना शोक अनावर झाला.

डोळ्यात पाणी, थरथरत्या हातांनी पार्थ, जय यांनी मानले सर्वांचे आभार

अजितदादांच्या पार्थिवाला त्यांची दोन्ही मुले पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. वडिलांना मुखाग्नी देताना दोन्ही मुले धाय मोकलून रडले. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना उपस्थितांचे डोळेदेखील पाणावले. यावेळी ‘अजितदादा अमर रहो, अजितदादा परत या’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी टाहो फोडला. अजितदादांना मुखाग्नी दिल्यानंतर त्यांची दोन्ही मुले पार्थ पवार आणि जय पवार यांनी थरथरते हात जोडून जड अंतःकरणाने उपस्थितांचे आभार मानले.

आईला रडू कोसळले

सकाळी सात वाजता अजितदादांचे पार्थिव त्यांचे मूळगाव काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले. अजितदादांच्या आई आशाबाई काटेवाडी येथे राहतात. आपल्या कर्त्या मुलाचे पार्थिव पाहून त्यांना रडू कोसळले. संपूर्ण पवार कुटुंब शोकसागरात बुडाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे,  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाध्यक्ष नितीन नबीन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मंत्री, नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी अजितदादांचे अंत्यदर्शन घेतले.

शिवसेना नेते अॅड. अनिल परब, शिवसेना नेते, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार बाबाजी काळे, कैलास पाटील, सिद्धार्थ खरात यांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, खासदार श्रीमंत शाहू महाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे,  चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, पंकजा मुंडे यांनी अंत्यदर्शन घेतले.

कार्यकर्त्याने स्वतःच्या रक्ताने रेखाटले दादांचे चित्र

अजितदादा म्हणजे कार्यकर्त्यांना जिवापाड जपणारे नेते. संकटाच्या वेळी कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभा राहणारा नेता अशी त्यांची ओळख होती. साहजिकच कार्यकर्तेही त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायचे. कार्यकर्त्यांचे अजितदादांवर किती प्रेम होते याची प्रचीती गुरुवारी बारामतीमध्ये आली. आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी बारामतीला धाव घेतली. सगळे ओक्साबोक्शी रडत होते. बार्शीतील एका कार्यकर्त्याने स्वतःच्या रक्ताने काढलेले अजितदादांचे चित्र यावेळी आणले होते. हे चित्र अजितदादांच्या नेतृत्वाबद्दल बरंच काही सांगून जात होते.