साय-फाय – चुकीच्या माहितीचे मायाजाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर, [email protected]

इंटरनेटने जगाला एक केले असे म्हटले जाते. जगातील विविध प्रांतांतील अनमोल ज्ञानाचा खजिना सर्वांसाठी सहजपणे उपलब्धदेखील झाला. कला, क्रीडा, मनोरंजन, व्यवसाय, पाककृती याबरोबर आरोग्यविषयक सल्लेदेखील इथे एका क्लिकवर उपलब्ध व्हायला सुरुवात झाली. मात्र आरोग्यासारख्या एखाद्या संवेदनशील विषयावर मिळालेल्या एखाद्या चुकीच्या माहितीमुळे किती गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते, प्रसंगी जीव गमावण्याची वेळदेखील एखाद्या व्यक्तीवर येऊ शकते हे आता समोर आले आहे

तामीळनाडूमधील मदुराईच्या सेलूर जिह्यातील मीनाबलपुरम येथील एका विद्यार्थिनीने यूटय़ूबवर वजन कमी करण्यासाठी काय करावे याचा सल्ला देणारा एक व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओमध्ये दिलेल्या सल्ल्यानुसार तिने बोरॅक्स या पदार्थाचे सेवन केले. मात्र या पदार्थामुळे काही वेळातच तिला खूप उलटय़ा झाल्या आणि ती बेशुद्ध पडली. तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले. मात्र रात्री तिची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आणि पुन्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सोशल मीडिया, यूटय़ूब, विविध मेसेजिंग अॅप्स यांच्या माध्यमातून वेगाने पसरणाऱ्या माहितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा माहितीची विश्वासार्हता न तपासता अनेक लोक तिच्यावर विश्वास ठेवतात आणि स्वतःच्या जिवाशी खेळतात. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ञांनी अशा व्हिडीओंवर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केली आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कोणतीही पदवी घेतलेली नसतानादेखील अनेक लोक स्वतःला आरोग्य सल्लागार, फिटनेस गुरू म्हणवून घेत लोकांना विविध विषयांवर व्हिडीओ अथवा लेखाच्या माध्यमातून अनेक चित्रविचित्र सल्ले देत असतात. अशा लोकांना आता चाप लावण्याची मागणी जोर पकडू लागली आहे.

कलैयारासी या विद्यार्थिनीचे वजन थोडेसे जास्त होते. वजन कमी करण्यासंदर्भातील एक व्हिडीओ पाहत असताना त्या व्हिडीओत बोरॅक्स हा पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात आल्याचे तिने पाहिले आणि तो उपाय अमलातदेखील आणला. स्थानिक फार्मसी म्हणून तिने बोरॅक्स खरेदी केले आणि जणू मृत्यूलाच आमंत्रण दिले. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ सांगतात की, बोरॅक्स हा एक विषारी पदार्थ आहे. रसायनशास्त्रात त्याला सोडियम बोरेट असे म्हणले जाते. सामान्य भाषेत सांगायचे तर ही पावडर आपण कॅरम खेळताना कायम वापरत असतो. काही लोक तिला मुंग्यांची पावडर म्हणूनदेखील ओळखतात.

या प्रकरणी आता सेलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवातदेखील केली आहे. दुसरीकडे मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी या प्रकरणाचा सर्व ठपका सदर यूटय़ूब व्हिडीओवर ठेवला असून अशा कोणत्याही पदार्थाचे सेवन वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याशिवाय न करण्याचा सल्लादेखील आपण मुलीला दिला होता असा दावा केला आहे. हा एक विषारी पदार्थ असून त्याचे थेट सेवन हे कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीसाठी हानिकारक आहे असे तज्ञ सांगतात.

शारीरिक जाडी हा आजदेखील आपल्या समाजात एक विनोदाचा विषय आहे. स्थूलपणा असणे हा जणू एक गुन्हा आहे असे त्या माणसाच्या मनावर विविध मार्गाने, थट्टा, टवाळीने सतत बिंबवले जात असते. स्थूलपणाने आरोग्याच्या किती मोठय़ा समस्या उद्भवू शकतात याची भीतीदेखील काही वेळा घातली जाते. अशावेळी थोडय़ाशा स्थूलपणालादेखील संकट समजलेली व्यक्ती मिळेल त्या सल्ल्याचा उपयोग आपले वजन कमी करण्यासाठी करायला सुरुवात करते. मात्र शारीरिक व्याधी असो वा स्थूलपणा असो, कोणत्याही समस्येवर उपाय शोधताना कायम वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञाचेच मत घेणे किती महत्त्वाचे आहे, हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

इंटरनेटवर उपलब्ध असलेले आणि प्रचंड चुकीची माहिती, गैरसमज पसरवणारे हे व्हिडीओ आता कायद्याच्या कक्षेत कसे आणले जातील आणि त्यांच्यावर कायमची बंदी घालून सदर व्यक्तींना शासन कसे देता येईल यासाठी संपूर्ण समाजाने सरकारवर दबाव निर्माण करण्याची आता गरज आहे.