
मागील काही महिन्यांपासून आपण स्त्री संतांचा परिचय घेत आहोत. भक्ती संप्रदायांनी भक्ती आंदोलनाच्या काळात स्त्रियांना स्थान, मान आणि सन्मान दिला. या अमृतकाळात महानुभव पंथात महदंबा, वारकरी संप्रदायात मुक्ताई, जनाई, सोयरा, भागू, निर्मला, कान्होपात्रा, बहिणाबाई, समर्थ संप्रदायात आक्कास्वामी, वेण्णास्वामी अशा तेजस्वी दीपकलिका उदयास आल्या. त्यांच्या भक्तीकार्याने, प्रबोधनाने धर्मांध पारतंत्र्यांच्या पाशवी वरवंटय़ाखाली स्वधर्मविन्मुख झालेल्या तळागाळातील, कष्टकरी वर्गातील महिलावर्गात आत्मविश्वासाचे आशाकिरण पल्लवीत झाले. मोठय़ा संख्येने महिला भक्तीमार्गाकडे वळल्या. या भक्तीकाळातील महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, वेण्णास्वामी या साऱया आपल्या नामभक्तीसामर्थ्यावर संतपदी विराजमान झाल्या. एवढेच नव्हे तर, या साऱया `संत’ होत्या तशाच भावकवयित्री होत्या. त्यांचे अभंग वाङ्मय मराठी साहित्य विश्वातील एक आशयघन अमृतठेवा आहे. या स्त्रीसंतांचे अभंग केवळ महिलांनाच नव्हे, तर सकल समाजाला दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत.


























































