
>> अभय मिरजकर
अहमदपूर येथील शेतकरी अजित ऊर्फ बालाजी रेड्डी यांनी एक प्रयोग म्हणून केळीची लागवड केली. पहिल्याच वर्षी थेट केळीची निर्यात करत इटलीच्या बाजारात पाठवण्यात आली. जवळपास 96 टन केळी निर्यात करत 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र आता कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी प्रोत्साहन देऊन काही शेतकऱयांना वेगळे प्रयोग करण्यास लावले आहेत. अहमदपूर येथील शेतकरी अजित ऊर्फ बालाजी रेड्डी यांना सहाय्यक कृषी अधिकारी विष्णू पुंडलिक कलमे यांनी अडीच एकरमध्ये केळी लावण्यासाठी तयार केले.
पाण्याची उपलब्धता असल्याने त्यांनी ठिबकचा वापर करत केळी लावण्याचे निश्चित केले. दहा ट्रॉली शेणखत टाकण्यात आले. जी. 9 या जातीची केळीची रोपे जळगाव येथून मागवण्यात आली. त्यासाठी 56 हजार रुपयांचा खर्च आला. बुरशीनाशक 500 ग्रॅम, किनॉलफास 250 एम.एल.चा वापर करण्यात आला. लागवडीसाठी 10 मजूर लावण्यात आले. त्यांच्याकडे अगोदरच ठिबक सिंचनाची सुविधा असल्याने त्या खर्चात बचत झाली. अत्यल्प रासायनिक खतांचा वापर करण्यात आला. केवळ तीन पोते रासायनिक खत वापरले आणि मापोन्युटरंट, जिवामृत, शेणखत, गोमूत्र‰ यांचा वापर करण्यात आला. जैविक पद्धतीचा अधिक वापर करण्यात आला. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत झाली. संपूर्ण रासायनिक खतांचा वापर करण्यात आला असता तर एकरी किमान 80 हजार रुपयांचा खर्च झाला असता त्यात बचत करण्यात आली. साधारणपणे 1 लाख 60 हजार रुपये लागवडीनंतर खर्च आला.
अहमदपूर परिसरात जवळपास 10 ते 12 शेतकऱयांनी प्रयोग म्हणून आता केळी लागवड केली आहे. ठिबकचा वापर केल्यामुळे पाणी योग्य प्रमाणात देता येते. पाण्याचा अपव्यय होत नाही. जिह्यातील शेतकरी आता वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर नवनवीन प्रयोग शेतकरी करत आहेत. उत्पन्नाची हमी मिळत असेल तर पीक पद्धतीत बदल करण्यास शेतकरी पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


























































