
>> अरुण
ऱ्हायनोसेरॉस म्हणजे स्वच्छ मराठीत गेंडा! आपल्याकडे आसाममध्ये त्यांची काझीरंगा नॅशनल पार्कमधली संख्या सुमारे 2300 तर एकूण 4000 आहे. त्यातलाच एक काही दिवसांपूर्वी रस्ता चुकला आणि भलतीकडेच भरकटत राहिला. तेव्हा तिथल्या रेन्जर्सनी त्याला मार्गदर्शन करून पुन्हा त्याच्या कळपात सोडला. आता गेंडा हाकणं हे गाईगुरं हाकण्याइतकं सोपं काम नव्हे. त्यासाठी दोन हत्ती मागवले आणि त्यावर बसून या एकशिंगी गेंडय़ाला मार्गावर आणावं लागलं. हे काम त्या गेंडय़ाच्या कलाकलानेच करावं लागलं असणार, कारण छोटा गेंडासुद्धा 600 टन वजनाचा असतो. समजा हा गेंडा पिसाळला असता तर?
गेंडय़ांच्या प्रजातीत आफ्रिकन आणि त्यातही पांढरे गेंडे आाढमक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या एकच तीक्ष्ण शिंगाने ते वाघसिंह अशा प्राण्यांनाही झुंजवतात, मग माणसाची काय कथा! त्यांची जगभरची संख्या सुमारे 27000 असून त्यात पांढऱया गेंडय़ांची गणना 15700 इतकी होते, परंतु जावा-सुमात्रा बेटांवरच्या गेंडय़ांची संख्या शिकारीमुळे फारच कमी झाली आहे. जावा बेटावर 50 तर सुमात्रामध्ये 37 ते 47 इतकेच गेंडे तग धरून आहेत.
गेंडय़ांच्या जाड त्वचेसाठी त्यांची शिकार होते. गेंडय़ाची अनेक थरांची (मल्टिलेयर) त्वचा सुमारे 5 सेंटीमीटर जाडीची असते. ती त्यांच्या शरीरातील प्रथिनांच्या वापरातून (कोलेज फायबर) तयार होते. त्यातून जाळीदार दिसणारी मजबूत गुंफण होऊन ’थिक स्कीन्ड’ गेंडा जंगलात वावरतो. माणसांच्या जगात, ज्याला कशाचीही पर्वा नसते अशा व्यक्तीला ’थिक स्कीन्ड’ किंवा गेंडय़ांच्या कातडीचा’ म्हटलं जातं. पण हे विशेषण गेंडय़ावर अन्याय करणारं आहे. कारण गेंडय़ाची जाड त्वचा निसर्गच त्याच्या रक्षणासाठी बनवतो. ती त्याच्या शरीराचं चिलखतच असते. आश्चर्य म्हणजे गेंडय़ाची जाड त्वचा चांगलीच सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील असते. साध्या कीटकांचा दंशसुधा त्या त्वचेला जाणवतो आणि प्रखर सूर्यप्रकाशाचा त्रासही होतो. गेंडय़ाच्या त्वचेतील थर, त्याच्या वैशिष्टय़पूर्ण दिसण्यासाठी नव्हे तर योग्य रक्ताभिक्षण, शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी असतात.
गेंडा काळसर, करडय़ा (ग्रे) असतो किंवा मातकट रंगाचे आणि काही ’शुभ्र’सुद्धा असतात. ही गोष्ट त्यांच्या त्वचेतील स्किन पिगमेंट किंवा रंगद्रव्यावर अवलंबून असते. अशा शुभ्र गेंडय़ांच्या एका प्रजातीमध्ये केवळ दोनच उत्तर आफ्रिकेत असून त्या दोन्ही ’फिमेल’ आहेत. त्यामुळे त्या प्रजातीचा वंश आता थबकल्यात जमा असून द. आफ्रिकेत इतरत्र मात्र पांढरे गेंडे आढळतात. हल्ली नव्या पिढीला एकशिंगी ’युनिकॉर्न’ ठाऊक असतो. तो काल्पनिक आणि ऱहायनो खरा!




























































