Badlapur news – गर्दीचा दुर्दैवी बळी; बदलापूरमध्ये लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकडे जाणारी लोकल पकडण्याच्या नादात तोल गेल्यामुळे थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळून एका विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. चेतना देवरुखकर (२८) असे या महिलेचे नाव असून ती नेहमीप्रमाणे ठाण्याला कामावर जात होती. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे देवरुखकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर हे गेल्या काही वर्षांपासून गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. प्रवाशांची वाढलेली संख्या आणि रेल्वे स्थानकातील अपुऱ्या सुविधा यामुळे अशा घटना घडत असून आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. बदलापूरच्या ज्युवेली गाव परिसरातील जगन्नाथ गॅलेक्सी या सोसायटीमध्ये चेतना देवरुखकर राहत होती. गेल्या वर्षीच तिचे लग्न झाले होते. ती ठाण्यात एका कंपनीमध्ये नोकरी करायची. आज नेहमीप्रमाणे तिने बदलापूर स्थानक गाठले आणि फलाट क्रमांक तीनवरून सकाळची ८.१० ची लोकल पकडण्याचा प्रयत्न केला.

लोकलची संख्या वाढवा

शनिवार असूनही मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल खचाखच भरली होती. चेतना देवरुखकर ही फलाटावर पोहोचताच लोकल सुटली. तरीही धावत जाऊन पुढचा लेडीज डबा पकडण्याचा तिने प्रयत्न केला. डब्यात चढत असतानाच आतील गर्दीमुळे तोल जाऊन ती ट्रॅकवर कोसळली. त्यात तिचा मृत्यू झाला. गर्दीनेच घेतलेला हा बळी असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक प्रवाशांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, लोकलची संख्या वाढवा अशी मागणी उपनगरीय रेल उपभोक्ता समितीचे सदस्य मनोहर शेलार यांनी केली आहे.

तिकीट निरीक्षकाने वाचवले प्रवाशाचे प्राण

पनवेल – धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढत असताना प्रवाशाचा तोल जाऊन तो फलाटाच्या गॅपमध्ये पडला. मात्र तिकीट निरीक्षकाने प्रसंगावधान दाखवत त्याचे प्राण वाचवले. अजित परब असे या प्रवाशाचे नाव आहे. पनवेल रेल्वे स्थानकात ही घटना घडली. दादर-तिरुनेलवेल्ली एक्स्प्रेस पनवेल स्थानकावरून सुटताच एका प्रवाशाने जनरल डब्यात चढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोल गेल्याने तो खाली कोसळला. तो गॅपमधून खाली जाण्यापूर्वीच तिकीट निरीक्षक महेश कांबळे यांनी प्रवाशाला बाहेर खेचल्याने त्याचे प्राण वाचले.