
केंद्र सरकारने अर्थसंकल्प 2026 मध्ये उच्च शिक्षण, संशोधन आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला आहे. प्रमुख औद्योगिक आणि लॉजिस्टिक कॉरिडोरच्या आसपास 5 विद्यापीठ नगरांची (युनिव्हर्सिटी टाउनशिप) उभारणी करण्यासाठी राज्यांना चॅलेंज पद्धतीने केंद्र सरकारकडून मदत दिली जाणार आहे. या नियोजित शैक्षणिक परिसरांमध्ये विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था, कौशल्य प्रशिक्षण केंद्रे तसेच निवासी संकुले उभारली जाणार आहेत. यामुळे शिक्षण, उद्योग आणि रोजगार यांचा समन्वय साधला जाणार आहे.
उच्च शिक्षणातील STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) संस्थांमध्ये दीर्घ अभ्यास आणि प्रयोगशाळेतील कामामुळे मुलींना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, प्रत्येक जिल्ह्यात एक मुलींचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून VGF किंवा भांडवली सहाय्य दिले जाणार आहे.
खगोलभौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राला प्रोत्साहन देण्यासाठी, प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाच्या उद्देशाने 4 दुर्बिणींच्या (टेलिस्कोप) पायाभूत सुविधा उभारल्या किंवा अद्ययावत केल्या जाणार आहेत. यामध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप, नॅशनल लार्ज ऑप्टिकल-इन्फ्रारेड टेलिस्कोप, हिमालयन चंद्रा टेलिस्कोप आणि COSMOS2 प्लॅनेटेरियम यांचा समावेश आहे.























































