
परळच्या गजबजलेल्या भागातून तीन वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी हा प्रकार घडला. शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या सतर्पतेमुळे हा प्रयत्न उधळला गेला. आरोपीला पकडून जमावाने चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
परळमधील डॉ. बाटलीवाला रोडवरील हरी बिल्डिंग येथून या तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. ही व्यक्ती अनोळखी असल्याने व हालचाली संशयास्पद दिसल्याने त्याला स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी हटकले. त्यानंतर मोठी गर्दी जमा झाली. जमावाने पकडून चोप देताच त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर शंभर नंबर हेल्पलाईनवर पह्न करून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती माजी शाखाप्रमुख रमेश सावंत यांनी दिली.
दरम्यान, भोईवाडा पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून त्याआधारे पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. आरोपी दारूच्या नशेत होता, असे सांगण्यात येत आहे.


























































