महिला रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकाच्या डोक्यात घातली लादी; ठाणे रेल्वे स्थानकात प्रवासी भरण्यावरून वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवासी भरण्यावरून दोन रिक्षाचालकांमध्ये तुफान राडा झाला. महिला रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकाच्या डोक्यात लादी घातली. या हल्ल्यात रिक्षाचालक लहू टकळगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी महिला रिक्षाचालक रेखा हिच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वर्तकनगर परिसरात राहणारे लहू टकळगे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गावदेवी मैदानाजवळील प्रणव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीसमोरील रस्त्यावर वर्तकनगरकडे जाणारे प्रवासी भरण्यासाठी लहू रिक्षा घेऊन उभे होते. यावेळी महिला रिक्षाचालक रेखा ही अचानक टकळगे यांच्या रिक्षासमोर आली.

‘इकडे गाडी कशाला लावलीस, गाडी बाहेर काढ,’ असे म्हणत महिलेने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. टकळगे यांनी आपला नंबर असल्याचे सांगून प्रवासी भरण्याची परवानगी मागितली असता महिलेने ‘पहिली माझ्या भावाची गाडी भरू दे, नंतर तू भर,’ असे म्हणत शिवीगाळ केली. हा वाद विकोपाला गेला आणि महिलेने टकळगे यांच्या कानाखाली मारून लादी डोक्यात घातली. रिक्षाचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तरुणाची हत्या

कारच्या डिपॉझिट रकमेवरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमन शेख असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या मित्राचेही अपहरण करण्यात आले. मात्र शिळ-डायघर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या दोन तासांत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सैफअली खान, शोएब खान आणि अरिफ खान यांना देसाई नाका येथून बेड्या ठोकल्या. तसेच अपहरण केलेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली. ही कारवाई पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.