…म्हणून वाढवला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या एका घोषणेमुळे शेअर बाजारात भूकंप आला. सेन्सेक्स आणि निफ्टी धाडकन कोसळले. शेअर बाजारात सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवण्याची घोषणा सीतारामन यांनी केली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण निर्मिती झाली आणि त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. मात्र हा निर्णय शेअर बाजारातील सट्टेबाजी रोखण्यासाठी घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. त्या म्हणाल्या, फ्युचर्स आणि ऑप्शन्सवरील कर वाढवणे आवश्यक होते. ऑप्शन्स ट्रेडिंगचे प्रमाण देशाच्या जीडीपी आणि शेअर बाजाराच्या आकाराच्या तुलनेत खूप जास्त होते तेव्हा ती निव्वळ सट्टेबाजी बनते. यामुळे ज्या लहान गुंतवणूकदारांना हा खेळ पूर्णपणे समजत नाही, त्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.

उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ हब

सरकार देशात 5 युनिव्हर्सिटी हब (विद्यापीठ पेंद्र) उभारणार आहे. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात, त्यांना त्याच स्तराचे शिक्षण भारतातच मिळावे, हा यामागील हेतू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी मोठे कर्ज घेण्याची किंवा व्हिसासाठी त्रास सहन करण्याची गरज भासणार नाही. यात खासगी क्षेत्र आणि परदेशी विद्यापीठांसोबत भागीदारीचाही समावेश असेल.

एआय मानवी श्रमाची जागा घेऊ शकत नाही

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आपल्याला एआयचा अविवेकी वापर करायचा नाही. हिंदुस्थानात एआयचे उद्दिष्ट तरुणांसाठी कामाच्या नवीन आणि आकर्षक संधी निर्माण करणे हे असले पाहिजे. एआय कधीही मानवी श्रमाची जागा घेऊ शकत नाही. भारतीय स्टार्टअप्स आधीच एआयचा वापर करत आहेत. आपल्याला केवळ मोठय़ा भाषा मॉडेल्सशिवाय (एलएलएम) लहान आणि मध्यम स्तरावरील मॉडेल्सचीदेखील गरज आहे, जे आपल्या अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करू शकतील, असे सीतारामन म्हणाल्या.