महिलांसाठी ‘शी-मार्ट’,  एआय प्रशिक्षणाची घोषणा, नारी शक्तीला बळकटी देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष योजना जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात महिला मतदारांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सत्तेची चावी महिलांच्या हाती राहणार आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी काही घोषणा केल्या आहेत.

शीमार्ट’ 

निर्मला सीतारामन यांनी ‘शी-मार्ट’ या संकल्पनेची घोषणा केली आहे. या माध्यमातून स्वयंसहायता गट, ग्रामीण महिला उद्योजक आणि स्टार्टअपशी संबंधित महिलांना त्यांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. ही केवळ विक्री केंद्र नसून एक इकोसिस्टम निर्माण करण्यात येणार आहे. ‘शी-मार्ट’ हे ई-कॉमर्स आणि ओएनडीसी या प्लॅटफॉर्मशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा मार्ग महिलांसाठी खुला होईल. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढेल, अशी अपेक्षा या माध्यमातून आहे.

नोकरी करणाऱ्या महिलांची सुरक्षा

शहरी आणि निमशहरी भागात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षा, रात्रीची वाहतूक व पाळणाघरांची सोय यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांच्या अडचणी दूर होतील. तसेच प्रवासातील भीती दूर करून महिला कर्मचाऱयांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न या योजनांमधून आहे.

मत्स्योत्पादनात महिलांचा सहभाग

मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी 500 जलसंधारण प्रकल्प आणि अमृत सरोवर विकसित करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच सागरी किनारपट्टीच्या भागात साखळी उभारून, महिलांचे नेतृत्व असलेल्या गटांना एकत्र आणून त्यांना बाजारपेठेशी संलग्न करण्यात येणार आहे. यामुळे महिला गटांचे उत्पन्न वाढेल.

मुलींची वसतिगृहे

विद्यार्थिनींसाठी निर्मला सीतारामन यांनी प्रत्येक जिह्यात मुलींची वसतिगृहे उघडण्याची घोषणा केली आहे. देशातील सुमारे 700 पेक्षा जास्त जिह्यांमध्ये विद्यार्थिनींच्या राहण्यासाठी या वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे.

स्किल आणि एआय प्रशिक्षण

महिलांना एआय आणि कौशल्य विकासासाठी अर्थसंकल्पात एआय, डिजिटल स्किल्स आणि ग्रीन जॉब्ससाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांना या क्षेत्रात रोजगाराच्या  संधी उपलब्ध होतील.