
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षआड दिल्या जाणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्कारांची सोमवारी घोषणा करण्यात आली. सह्याद्री देवराईचे प्रणेते, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना लोकसेवा क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले (नाटय़), चंद्रमोहन कुलकर्णी (चित्र), उस्ताद उस्मान खान (संगीत), शास्त्र्ाज्ञ डॉ. अनिरुद्ध पंडित (विज्ञान) व गिर्यारोहक आशिष माने (साहस) हे पुरस्कारांचे मानकरी आहेत. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी 10 मार्च रोजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
कुसुमाग्रज स्मारक येथे सोमवारी पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष कवी प्रकाश होळकर यांनी पुरस्कारार्थींच्या नावांची घोषणा केली. लोकसेवा क्षेत्रातील पुरस्कारासाठी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष, चतुरस्त्र्ा अभिनेते प्रशांत दामले यांना नाटय़ क्षेत्रातील योगदानासाठी गोदावरी गौरव पुरस्कार दिला जाईल. मुखपृष्ठकार चंद्रमोहन कुलकर्णी यांना चित्र क्षेत्रासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येईल, त्यांनी अनेक मान्यवर प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांची, नियतकालिकांची मुखपृष्ठs, त्यातील कथाचित्रे चितारून, अनेक कलात्मक प्रयोग करून या क्षेत्रात ठसा उमटवला आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तिचे सतारवादक उस्ताद उस्मान खान यांना संगीत क्षेत्रातील, तर रसायन अभियांत्रिकी संशोधक शास्त्र्ाज्ञ डॉ. अनिरुद्ध पंडित यांचे नाव विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी निवडण्यात आले आहे.
अध्यक्षांकडूनच 11व्या विश्वस्ताची निवड
विश्वस्त पदासाठी सूचवलेली तीन नावे नाकारली गेल्याने कार्यवाह सुरेश भटेवरा यांनी ऑक्टोबरमध्ये राजीनामा दिला, त्यामुळे प्रतिष्ठानमधील मतभेद चव्हाटय़ावर आले. नंतरच्या बैठकीत एक नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आले, मात्र, ते जाहीर न केल्याने कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पुढे थेट संकेतस्थळावर मंदार भारदे यांचे नाव प्रसिद्ध केले गेले. याविषयी आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता भारदे यांची निवड अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या उपस्थितीतच झाली. भारदे यांच्या संमतीनंतर नाव संकेतस्थळावर प्रसिद्ध केले, किमान अकरा विश्वस्त असावेत, याप्रमाणे ते अकरावे विश्वस्त निवडले गेले आहेत, अशी माहिती देत पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.


























































