मुंढवा जमीन घोटाळ्याच्या आरोपपत्रात शीतल तेजवानी, पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची नावे गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील मुंढवा परिसरातील शासकीय जमिनीच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणात मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिच्याविरोधात पोलिसांनी तब्बल 1886 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासह दिग्विजय पाटील यांचे दोषारोपपत्रामध्ये नाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र संबंधित गुह्यातील इतर आरोपींकडे तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुंढव्यातील कोटय़वधी रुपयांची 40 एकर शासकीय जमीन अमेडिया कंपनीला 300 कोटी रुपयांना विक्री प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले,  हेमंत गवंडे, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद केला होता. खडक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद केला होता. संबंधित गुह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. वारसदारांकडून पॉवर ऑफ अॅटर्नी करून घेत तेजवानीने त्यातील काही वारसदारांना धनादेश वितरित केले होते. त्यानंतर जमिनीची विक्री अमेडिया पंपनीला केली होती. त्यानंतर तिला या प्रकरणी अटक केली होती.

इतर आरोपींकडे तपास अद्याप सुरू

न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रानुसार सर्व आरोपींची भूमिका स्पष्ट झालेली नाही. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले व दिग्विजय पाटील यांच्यासह इतर काही संशयितांचा तपास सुरू असल्याचे नमूद केले आहे. आवश्यक पुरावे आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बोपोडी प्रकरणाचाही उल्लेख

मुंढवा जमीनविक्री प्रकरणातच हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बोपोडीतील शासकीय जमीन प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून नमूद करण्यात आले आहे.