ICC T20 World Cup – टी-20 वर्ल्डकपमध्ये ‘ओल्ड इज गोल्ड’; चाळीशी पार केलेले ‘हे’ खेळाडू तरुणांना देणार आव्हान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 क्रिकेट हा तरुणांचा खेळ म्हटला जातो. कारण टी-20 हा कसोटी आणि वन डे क्रिकेट पेक्षा वेगवान फॉरमॅट आहे. त्यामुळे टी-20 संघात अनेकदा तरुण खेळाडूंचा भरणा आपल्याला दिसतो. मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये काही चाळीशी पार केलेले खेळाडूही तरुणांना आव्हान देताना दिसणार आहेत. आज आपण त्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया…

ब्रँडन टेलर

झिम्बाब्वेचा अनुभवी यष्टीरक्षक बॅटर ब्रँडन टेलर याचे बंदीनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागम झाले आहे. वर्ल्डकप सुरू होण्याच्या एक दिवस आधी 6 फेब्रुवारीला तो चाळीस वर्षांचा होईल. त्याने आतापर्यंत 58 टी-20 आंतरराष्ट्रीय लढतीत 1185 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 6 अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे. गतवर्षी बोत्सवानाविरुद्ध 123 धावांची खेळी करत टी-20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात वयस्कर खेळाडूचा मान त्याला मिळाला.

मोहम्मद नबी

अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू 1 जानेवारीला 41 वर्षांचा झाला. 2010 मध्ये अफगाणिस्तानने पहिल्यांदा टी-20 वर्ल्डकप खेळला होता, त्या संघातही नबी होता. त्यानंतर त्याने अफगाणिस्तानचे कर्णधारपदही भूषवले. त्याने आतापर्यंत 147 आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीत 2430 धावा केल्या असून 104 विकेट्सही घेतल्या आहेत. आशियाई खेळपट्ट्यांवर तो प्रभावी कामगिरी करू शकतो.

रुफोन वॅन डेर मेरवे

दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड या दोन्ही देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला रुफोन वॅन डेर मेरवे यानेही चाळीशी पार केलेली आहे. 31 डिसेंबर रोजी तको 41 वर्षांचा झाला. त्याने 67 आंतरराष्ट्रीय टी-20 लढती खेळल्या असून यात त्याच्या नावावर 561 धावा आणि 74 विकेट्स आहेत. त्याचा बॉलिंग एव्हरेज 18.85 असून इकोनॉमी 6.51 आहे.

वेन मॅडसन

इटलीच्या क्रिकेट संघाची धुरा सांभाळणारा वेन मॅडसन 2 जानेवारी रोजी 42 वर्षांचा झाला. डरबनमध्ये जन्मलेल्या मॅडसनने आतापर्यंत फक्त 7 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. मात्र त्याचा अनुभव इटलीसाठी महत्त्वाचा आहे. त्याच्या नावावर 205 धावा असून यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. नुकतीच त्याने आयर्लंडविरुद्ध 61 धावांची महत्त्वाची खेळी केली होती.

मोहम्मद नदीम

 

यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात वयस्कर खेळाडूचा मान ओमानच्या मोहम्मद नदीमला मिळाला आहे. 43 वर्षीय नदीमचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. त्याने आतापर्यंत 70 आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीत 805 धावा केल्या असून 40 विकेट्सही घेतल्या आहेत.