
बारामती येथील विमानत अपघातात मृत्युमुखी पडलेलेल्या फ्लाईट अटेन्डेंट पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पिंकीच्या कुटुबिंयांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले व या कठीण प्रसंगी शिवसेना त्यांच्या समवेत ठामपणे उभी आहे, असा विश्वास त्यांना दिला. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांना संसदेत बोलू दिले नाही त्यावर आपले मत मांडले. ‘देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेविषयी आपल्या संसदेत नाही तर काय पाकिस्तानच्या संसदेत प्रश्न विचारायचा का? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला.
”आपल्याच देशाच्या संसदेत आपल्याच राष्ट्रीय सुरक्षेविषयी विषय काढायचा नाही तर कुणाचा काढायचा. आपल्या संसदेत प्रश्न नाही विचारायचा तर काय पाकिस्तानच्या संसदेत विचारायचा का? ज्यांच्या पुस्तकाचा विषय सुरू आहे, त्यांना चिफ ऑफ डिफेन्स एनडीएच्या सरकारने केलं होतं. त्यांनी जे लिहलं आहे त्याविषयी बोलायचं नाही, चीनच्या घुसखोरीविषयी बोलायचं नाही. सरकारला एवढी राहुल गांधींची भिती का वाटते? जे काही खरं खोटं ते ऐकून तर घ्यायचं ना, पण सरकारला ऐकूनच घ्यायचंच नाही. लोकशाही संपली हे त्यांनी आता जगाला जाहीर करून टाकलं पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
अमेरिका हिंदुस्थान डिलविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ”ऐतिहासिक डील बद्दल बरंच काही बोललं जात आहे. पण जर तुम्ही बघितलं की ट्रम्प यांनी जे ट्विट केले आहे त्यात आणि आपल्या पंतप्रधानांनी जे ट्विट केले आहे त्यात खूप अंतर आहे. ही डिल ऐतिहासिक कुणासाठी आहे हे देखील विचारायला हवे. ट्रम्प जसे पत्रकार परिषद घेतात तसे मोदींनी देखील पंतप्रधानांनी देखील पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी”̣




























































