ऑगस्टा वेस्टलँड सैन्यासाठी पुन्हा हेलिकॉप्टरचा पुरवठा करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इटलीची कंपनी ऑगस्टा वेस्टलँड क्लीन चिट मिळाल्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा हिंदुस्थानच्या संरक्षण क्षेत्रात प्रवेश करणार आहे. ही तीच कंपनी आहे, जिचे नाव बहुचर्चित व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याशी जोडले गेले होते. याने जवळपास एक दशक हिंदुस्थानी राजकारणाला हादरवून सोडले होते. अगस्ताची मूळ कंपनी लिओनार्डोसोबत अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसच्या कराराला अंतिम रूप देण्यात आले आहे. लिओनार्डो पूर्वी फिनमेकॅनिका या नावाने ओळखली जात होती.

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा 3,600 कोटींचा एक व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा आहे. यात कंपनीवर 12 एडब्ल्यू-101 (एडब्ल्यू-101) हेलिकॉप्टरच्या खरेदीत हिंदुस्थानी वायुसेनेच्या अधिकाऱयांना आणि दलालांना जवळपास 360 कोटींची लाच दिल्याचा आरोप आहे. हिंदुस्थानने 2014 मध्ये हा करार औपचारिकपणे रद्द केल्यानंतर कंपनीला ब्लॅकलिस्ट केले होते. पुराव्यांअभावी आधी इटलीच्या न्यायालयाने आणि नंतर नोव्हेंबर 2021 मध्ये संरक्षण मंत्रालयाने ऑगस्टा वेस्टलँडला क्लीन चिट दिली होती. 2013 मध्ये इटलीच्या तपास यंत्रणांनी लाचखोरीच्या आरोपांची चौकशी सुरू केली.

या करारामध्ये मध्यस्थांची भूमिका समोर आली. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आणि अशी वेळ आली की, या कराराच्या वेळी वायुसेनाप्रमुख असलेले एअर चीफ मार्शल एस. पी.  त्यागी आणि इतर काही लोकांना तुरुंगातही जावे लागले. सीबीआयने 2010 मध्ये 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरच्या पुरवठय़ासाठी झालेल्या करारामुळे सरकारी तिजोरीला 398.21 दशलक्ष युरो म्हणजेच जवळपास 2,666 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप केला. ईडीने 2016 मध्ये दाखल केलेल्या आपल्या आरोपपत्रात दावा केला होता की, मिशेलला अगस्ता वेस्टलँडकडून 30 दशलक्ष युरो मिळाले होते.