
छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रियकराने आपला मोबाईल नंबर आणि मेसेज ब्लॉक केल्यामुळे संतप्त झालेल्या एका 22 वर्षीय तरुणीने प्रियकराची चाकू भोसकून हत्या केली. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिलासपूर येथील गौरी गणेश कॉलनीमध्ये घडली. रोशनी सूर्यवंशी असे आरोपी तरुणीचे नाव असून ती सीपत येथील झलमला परिसरातील रहिवासी आहे. रोशनी आणि मृत कामता प्रसाद (25) यांची साधारण सहा महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. कामता प्रसाद हा गौरी गणेश कॉलनीतील एका भाड्याच्या घरात राहत होता आणि स्थानिक हॉटेलमध्ये कामाला होता.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून या दोघांमध्ये संवाद झाला नव्हता, कारण कामताने रोशनीचा नंबर ब्लॉक केला होता. आपला नंबर ब्लॉक केल्यामुळे आणि कामताचे इतर कोणाशी तरी प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या संशयामुळे रोशनी प्रचंड संतापलेली होती. याच रागाच्या भरात मंगळवारी ती चाकू घेऊन थेट कामताच्या घरी पोहोचली. तिथे दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झटापटीदरम्यान रोशनीने कामतावर चाकूने वार केले, ज्यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक चौकशीत रोशनीने सांगितले की, तिने चाकू फक्त त्याला घाबरवण्यासाठी नेला होता, मात्र मोबाईल ओढाओढीच्या वादात त्याला चाकू लागला आणि त्याचा जीव गेला. सध्या पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.




























































