
संसद अधिवेशनाचा तिसरा दिवसही आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गाजवला. चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावर सत्ताधाऱयांनी लोकसभेत बोलू न दिल्याने राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे पुस्तकच संसदेत फडकवले. इतकेच नव्हे, त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर पुस्तकातील उताऱयांचे जाहीर वाचन केले. ‘‘मोदी संसदेत आल्यास मी त्यांना हे पुस्तक भेट देईन, पण ते येतील असे वाटत नाही. त्यांच्यात ती हिंमत नाही,’’ असा घणाघाती हल्ला राहुल यांनी चढवला.
हिंदुस्थान-अमेरिकेतील व्यापार करार व चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावरून आज विरोधकांनी संसदेत सरकारला अक्षरशः सळो की पळो करून सोडले. विरोधी पक्षाच्या महिला खासदार रुद्रावतार धारण करत अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत उतरल्या. त्यांनी फलक झळकावत सत्ताधारी बाकांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहाचा रागरंग पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण देणे सोडाच, सभागृहात येणेही टाळले. त्यामुळे बिथरलेल्या सत्ताधाऱ्यांनी सलग तिसऱ्या दिवशी सभागृहात धुडगूस घातला. विरोधकांनीही त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. ‘घाबरल्यामुळेच पंतप्रधान सभागृहात आले नाही, असा हल्ला काँग्रेसने चढवला. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जोवर सभागृहात बोलू दिले जात नाही, तोवर आम्ही मोदींना बोलू देणार नाही,’ असा थेट इशारा काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी दिला.
अमेरिकेसोबतचा व्यापार करार हा उपयोगी असल्याचा दावा केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी आज सभागृहात केला. विरोधकांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला. त्याचवेळी राहुल गांधी यांनी मनोज नरवणे यांचे अप्रकाशित पुस्तक सभागृहात दाखवले. त्यामुळे गोंधळ वाढला आणि कामकाज सुरुवातीला दुपारी बारा, नंतर दोन, नंतर तीन व त्यानंतर पाच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
पंतप्रधान मोदी हे सायंकाळी पाच वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देणार होते. मात्र, गोंधळामुळे त्यांचे भाषणही होऊ शकले नाही. गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सभापतींच्या दालनात गदारोळ
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. त्यावेळी तिथे विरोधी पक्षाच्या खासदारांनी तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केल्यामुळे गदारोळ झाला.
राहुल यांच्या ‘गद्दार’ टिप्पणीवरून वाद
मोदी सरकारच्या निषेधार्थ काँगेसच्या सात निलंबित खासदारांनी आज सेंट्रल विस्टाच्या मकर द्वाराजवळ धरणे आंदोलन केले. काँगेस खासदार घोषणाबाजी करत असतानाच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले व सध्या केंद्रीय मंत्री असलेले रवनितसिंग बिट्टू यांनी ‘हे कारगील युद्ध जिंकून आल्यासारखे करतायत,’ असा टोमणा मारला. राहुल यांनी बिट्टू यांना खोचक उत्तर दिले. ‘हे पाहा ‘गद्दार’ चालले आहेत. ह्यांचे तोंड बघा. ह्यांना पुन्हा काँग्रेसमध्येच यावे लागेल,’ असे म्हणत राहुल यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, बिट्टू यांनी हात मिळवण्याचे नाकारत ‘देश के दुश्मन’ अशी टिप्पणी केली. त्यावर काँग्रेसच्या खासदारांनी ‘सरेंडर, सरेंडर’ अशी घोषणाबाजी केली.































































