पनवेलमध्ये भाजपच्या दोन आमदारांत जुंपली; विक्रांत पाटील यांची तक्रार प्रशांत ठाकूर करणार भाजप प्रदेशाध्यक्षांकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबईतील भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्ष जगजाहीर असतानाच आता पनवेलमधील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि विक्रांत पाटील यांच्यामध्येही जोरदार जुंपली आहे. विकास निधीचे वाटप करताना आमदार विक्रांत पाटील हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत. अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार निधी देत आहेत. त्यामुळे त्यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे.

भविष्यात पनवेलचे दोन मतदारसंघ होणार असल्याने या नवीन मतदारसंघातून उभे राहण्यासाठी विक्रांत पाटील इच्छूक आहेत. त्यांनी या पार्श्वभूमीवर आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र आपल्या आमदार निधीतून कामांचे वाटप करताना पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेतल्याचा आरोप प्रशांत ठाकूर यांनी केला आहे.

पाटलांची सारवासारव

आमदार प्रशांत ठाकूर आणि माझ्यामध्ये कोणताही वाद नाही. ठाकूर हे मला मोठ्या भावासारखे आहेत. पक्षाच्या वाढीसाठी आपण निधीचे वाटप करत असतो. त्यावरून काही जणांनी राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांचा गैरसमज झाला असून या गैरसमजातूनच त्यांनी हे आरोप केले आहेत. मी लवकरच त्यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करणार आहे, अशी सारवासारव भाजपचे विधान परिषदेतील आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे.