
अहिल्यानगर शहरात प्रवेश करताना चहुबाजूंनी साचलेल्या कचऱयाच्या ढिगांमुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे, असा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते तथा जागतिक पर्यावरण विकास सरकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ गवते यांनी केला आहे. शहराच्या दर्शनी भागात साचलेले कचऱयाचे ढीग तत्काळ उचलण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कचरा तत्काळ उचलला नाही, तर 14 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ‘कचरा फेक’ आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील बुऱहाणनगर व भिंगार परिसरातून अहिल्यानगरकडे येणाऱया रस्त्यांच्या कडेला मोठय़ा प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीकडून शहरात येताना तसेच महामार्गाच्या कडेलादेखील कचऱयाचे ढीग दिसून येतात. परिणामी, शहरात प्रवेश करतानाच नागरिक व पाहुण्यांना घाणीचे दर्शन घडत असून, यामुळे अहिल्यानगरची स्वच्छ शहर म्हणून असलेली ओळख धोक्यात आली आहे.
गोरक्षनाथ गवते म्हणाले, एकीकडे शहराला स्वच्छतेसाठी विविध पुरस्कार मिळत असताना, दुसरीकडे प्रवेशद्वारावरच कचऱयाचे ढीग दिसणे ही दुर्दैवी बाब आहे. जागतिक पर्यावरण विकास सरकार संघटनेच्या बैठकीत बोलताना गोरक्षनाथ गवते यांनी वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. मुंबई, दिल्लीसह अनेक महानगरांमध्ये प्रदूषणाने भयंकर स्वरूप धारण केले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारतात सुमारे 42 टक्के वनक्षेत्र होते, आज ते केवळ 0.4 टक्क्यांवर आले आहे, ही बाब चिंताजनक आहे.
या बैठकीस पोपटराव पटारे, नीलेश साठे, विकास भीटे, प्रकाश भिटे, सचिन गवते, किरण गवते, महेश मंडलिक, सीताराम मंडलिक, गोविंद गडाख, दत्ता देवकर, मनोज देशमाने, नवनाथ गवते, अरुण गवते, गणेश भिटे, भाऊसाहेब मोरे, शिवाजी पालवे, अंबादास कांडेकर, पोपटराव महारनवर आदी मान्यवर उपस्थित होते.
कचऱयामुळे प्राणीजीवन धोक्यात
शहरात साचलेल्या कचऱयामुळे पर्यावरणातील अनेक सजीवांवर गंभीर परिणाम होत आहेत. रस्त्यालगत असलेल्या कचऱयातील प्लास्टिक खाल्ल्याने गायी, कुत्रे यांसारख्या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक साचत असून, त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय, कचऱयामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, मोठय़ा प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले आहे.
































































