
>>साधना गोरे<<
स्त्रियांचे पारंपरिक अलंकार वैज्ञानिकदृष्टय़ा तिच्या आरोग्याला कसे हितकारक आहेत, हे धर्माभिमानी आणि संस्कृती रक्षक विविध व्यासपीठांवरून सांगताना दिसतात. उलट बांगड्या, जोडवी, पैंजण यांसारख्या सौभाग्यालंकारामुळे स्त्रियांच्या हालचालींवर बंधनं येतात आणि या दागिन्यांचा आवाज, तिचा वावर कुठं आहे याचीही घरातल्यांना सतत वर्दी देत राहतात, अशी स्त्रीवादाची मांडणी आहे. अर्थात, आधुनिक स्त्री अशा सौभाग्यालंकाराच्या बंधनातून हळूहळू मुक्त होताना दिसत असली तरी काकणं किंवा बांगड्या हा आजही स्त्रीचा महत्त्वाचा सौभाग्यालंकार मानण्याकडे समाजाचा कल आहे. बाईच्या सुसंस्कृतपणाशी जोडल्या गेलेल्या ‘काकण’ या शब्दाचं मूळ संस्कृतमधील ‘कंकण’ या शब्दात आहे. मनगटात घातल्या जाणाऱ्या या अलंकाराच्या किणकिण आवाजावरून ‘किंकिङ् – किंकिणी – कङ्कण – काकण’ अशा क्रमाने मराठीत हा शब्द आल्याचं दिसतं. कृ. पां. कुलकर्णींनी संस्कृतमधील ‘कंकण’ या शब्दाचं लॅटिनमधील म्ग्हा (सिन्गर) शब्दाशी साम्य असल्याचं म्हटलं आहे. लॅटिनमधील या शब्दाचा अर्थ ‘वर्तुळ’ (सर्कल) असा होतो. काकणाचा आकारही वर्तुळाकार असतो हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. किंचितशा ध्वनी फरकाने आर्य भारतीय आणि द्राविडी या दोन्ही कुळातील भाषांमध्ये ‘कंकण’ शब्द आढळतो.
काकणं किंवा बांगड्या हा अलंकार स्त्राrत्वाशी इतका निगडित आहे की, बऱ्याचदा पळपुटय़ा, भित्र्या माणसाला उद्देशून ‘बांगड्या भरा’ किंवा ‘काकणं घाला’ असा शब्दप्रयोग केला जातो. अर्थात हे म्हणणाऱ्याने स्त्रिया भित्र्या असतात हे गृहीत धरलेलं असतं. स्त्राrचं सौभाग्य म्हणजे तिच्या पतीचं आयुष्य संकटात असल्याचं सूचित करणाऱ्या कितीतरी म्हणी आणि वाक्प्रचार काकणांशी संबंधित असल्याचं दिसतं. माणसं मेली या अर्थाचे ‘सव्वा लाख बांगडी फुटली’ हे वाक्य ऐकलं की, आजही मराठी माणसाला पानिपतच्या युद्धाची आठवण होते. बांगडी फुटण्याच्या या अपशकुनामुळेच गावाकडील स्त्रिया आजही हातातलं काकण फुटलं, पिचलं तरी तसं न म्हणता ‘काकण वाढलं’ असं म्हणतात.
एखाद्या बाईच्या हातातली सगळी काकणं फुटून एकच राहिलं तर तेही शुभ मानलं जातं. धन्याच्या म्हणजे पतीच्या रक्षणासाठीच ते राहिलं आहे हे सुचवणारी ‘एकच काकण, धन्याला राखण’ ही म्हण प्रचलित आहे. स्त्रीचे कान, नाक, गळा या अवयवांवरील अलंकार तिला आरशाशिवाय पाहता येत नाहीत, पण काकणांचं तसं नाही. ते तिला आरशाशिवायही दिसू शकतात. यावरून जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते, त्यास पुराव्याची गरज नसते या अर्थाने ‘हातच्या पंकणाला आरसा कशाला?’ असं म्हणायची पद्धत रूढ झाली असावी.
एखादी गोष्ट दुसरीपेक्षा किंचितशी उजवी आहे, असं सांगताना ‘काकणभर सरस’ असा शब्दप्रयोग केला जातो. मात्र यातील काकण म्हणजे बांगड्या हा अलंकार नव्हे, तर त्याचा संबंध अत्यंत कमी मूल्य असलेल्या ‘काकिणी’ नावाच्या जुन्या नाण्याशी आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांना जाग आली की, त्यांची निजानीज होईपर्यंत घरात काकणांची किणकिण ऐकू येत असे. यावरून मध्यरात्र सरली आहे, पण अजून पहाट झाली नाही, अशा वेळेचा उल्लेख करताना ‘काकणं वाजायच्या आधी’ असं म्हटलं जाई. तसंच रात्री सामसूम झाली म्हणजे ‘काकणं बंद झाली’ असा शब्दप्रयोग केला जाई आणि आजही केला जातो.
साने गुरुजींच्या ‘हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले’ या गीतातील ‘कंकण’ म्हणजे प्रतिज्ञा. पूर्वी यज्ञाला सुरुवात करण्यापूर्वी यजमान दीक्षासूत्र बांधीत असे. यावरून एखाद्या कार्याला वाहून घेणं या अर्थानं ‘कंकण बांधणे’ हा शब्दप्रयोग केला जातो. आताही काही राजकीय पक्ष आपला कार्यकर्ता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ राहावा म्हणून असं कंकण बांधताना आढळून येतात. बांगडीशी संबंधित एक मजेशीर शब्दप्रयोग मराठीत आहे तो म्हणजे ‘उचलबांगडी’. कोळ्याच्या जाळ्याला ‘पांगडी’ म्हटलं जातं. या पांगडीचा अपभ्रंश होऊन हा शब्दप्रयोग तयार झाल्याचं ‘मराठी वाक्यसंप्रदाय’मध्ये म्हटलं आहे. गळाला लावलेले जाळे माशांनी भरलं की, कोळी ज्या प्रकारे चहूकडून धरून उचलतो; तसं पूर्वी गावाकडे शाळेत न येणाऱ्या मुलाचे हातपाय धरून इतर मुलं त्याला अधांतरी उचलून शाळेत आणत. या क्रियेत हातपाय धरल्यामुळे व्यक्तीची पांगळ्याप्रमाणे अवस्था होत असणार. त्यामुळे ‘पांगडी’ शब्दांचा ‘पांगळा’ शब्दाशी काही संबंध आहे का? याचाही विचार करायला हवा. मात्र या क्रियेतील लक्ष्यार्थावरून हल्ली ठरवून एखाद्याची विशिष्ट पदावरून हकालपट्टी केली म्हणजे ‘त्याची उचलबांगडी केली’ असं म्हटलं जातं.






























































