
हार्बर मार्गावरील वांद्रे आणि खार स्थानकांदरम्यान असलेल्या जुन्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. जुन्या पुलाचे पाडकाम करून त्याची नवीन जागेत उभारणी करण्याचे नियोजन केले जात आहे. या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोरेगाव स्थानकांदरम्यानची लोकल सेवा तीन महिने बंद ठेवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक स्वतंत्र ट्रकवरून चालवण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. गेल्या महिन्यात कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गीकेचे काम पूर्ण करण्यात आले. त्यापाठोपाठ आता माहीम रेल्वे स्थानकाच्या परिसरातील अतिक्रमणाचा अडसर दूर करण्याच्या अनुषंगाने सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर मार्गावरील वांद्रे पुलाची जागा बदलण्याचे नियोजन केले जात आहे.
वांद्रे पुलाच्या पुनर्बांधणीचे नियोजन
सध्या सीएसएमटी येथून येणाऱया लोकल पूर्वेकडील ट्रकवरून वांद्रे पूल ओलांडून पश्चिमेकडील ट्रकवर जात पुढे गोरेगावच्या दिशेने मार्गस्थ होतात. कित्येक वर्षे पश्चिम आणि हार्बर रेल्वेचा महत्त्वपूर्ण दुवा म्हणून उभा असलेला हा पूल दुसऱ्या जागेत हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या अतिरिक्त मार्गिकांचे काम करण्यासाठी वांद्रे पुलाचे पाडकाम केले जाणार आहे. त्यासाठी सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर सेवा तीन महिने बंद ठेवण्याचे नियोजन केले जात आहे.
सीएसएमटी-पनवेल सेवा कोलमडली, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी
हार्बर लाइनवर एसी लोकल सुरू केल्यापासून या मार्गावरील गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले आहे. अप दिशेने येणाऱया सर्वच लोकल 15 ते 25 मिनिटे उशिराने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) पोहोचत आहेत. त्यातच गुरुवारी दुपारी तांत्रिक बिघाडामुळे काही लोकल फेऱया रद्द झाल्याने पनवेल स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. हार्बर लाइनवर ‘प्रजासत्ताक दिना’पासून एसी लोकलची सेवा सुरू करण्यात आली आहे. दिवसभरात एसी लोकलच्या 14 फेऱया धावत आहेत. या फेऱयांमुळे प्रवास आरामदायी बनण्याच्या तुलनेत अधिक त्रासदायी बनला आहे.


























































