
मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला. चुराचांदपूर जिल्ह्यात नव्या प्रशासकीय रचनेला आणि कुकी नेत्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला विरोध करत निदर्शकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली.
चुराचांदपूरमधील तुईबोंग बाजार परिसरात आंदोलक मोठ्या संख्येने जमले होते. ‘स्वतंत्र प्रशासन’ देण्याची मागणी प्रलंबित असताना कुकी आमदारांनी सरकारमध्ये सामील होणे आंदोलकांना मान्य नसल्याचे दिसून आले. विशेषतः नेमचा किपगेन यांची उपमुख्यमंत्री पदी झालेली नियुक्ती आंदोलकांच्या संतापाचे मुख्य कारण ठरली. बुधवारी किपगेन यांनी शपथ घेतल्यापासूनच जिल्ह्यात तणावाचे वातावरण होते.
सुरक्षा दलांवर दगडफेक
मिळालेल्या माहितीनुसार, निदर्शकांनी लाकूड, टायर आणि इतर टाकाऊ वस्तू जाळून रस्ते अडवण्याचा प्रयत्न केला. जमावाने नेमचा किपगेन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सुरक्षा दलांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली. जमावाची संख्या सुरक्षा रक्षकांपेक्षा जास्त असल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, ज्यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष
जिल्ह्यात सध्या प्रचंड तणाव असून कोणतीही मोठी मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे. ‘परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीची कुमक पाठवण्यात आली असून आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत’, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
fresh protests in manipur churachandpur over new bjp government formation
tensions flare in manipur’s churachandpur district as protesters oppose the new government and nemcha kipgen’s appointment as deputy cm. check latest updates.

























































