
चीनची घुसखोरी, अमेरिकेसोबत व्यापार करार यासह सर्वच कळीच्या मुद्दय़ांवर चर्चेपासून पळ काढणाऱ्या सरकारला इंडिया आघाडीने ‘सळो की पळो’ करून सोडले. ‘हुकूमशाही खपवून घेणार नाही’ असे ठणकावत आज विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभा दणाणून सोडली. काँग्रेस सदस्यांनी वेलमध्ये येत सरकारविरोधात घोषणा दिल्या. या गोंधळामुळे अवघ्या दहा मिनिटांत लोकसभेचे कामकाज गुंडाळले.
पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर देताना काँग्रेसवर आरोपांची जुनीच टेप लावली. काहीतरी अघटित घडले असते म्हणून पंतप्रधान लोकसभेत आले नाहीत, असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले होते. त्याचे तीव्र पडसाद आज उमटले.
माजी लष्करप्रमुख मनोज नरवणेंचे पुस्तक, भारत- अमेरिका व्यापार करार, एपस्टीन फाईल्स या मुद्दय़ांवरून आज काँग्रेससह विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक होते.लोकसभेचे कामकाज सुरू होताच खासदारांनी वेलमध्ये येत नरेंद्र मोदी व सरकारविरोधात घोषणा दिल्या. तुमचा सभागृह चालविण्याचा काही मानस दिसत नाही, अशी टिप्पणी करत अध्यक्ष बिर्ला यांनी कामकाज सुरुवातीला दुपारी बारापर्यंत तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘संविधान बचाव’चा नारा दिला. सभागृह नियंत्रणात नाही, हे लक्षात येताच अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले. आधी तीन मिनिटे आणि नंतर सात मिनिटे इतकाच वेळ सभागृह चालले.
योग्य वाटेल तेच करा… राहुल यांनी पुन्हा मोदींना डिवचले
‘जे योग्य वाटते ते करा’ असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या घुसखोरीवर माजी लष्करप्रमुख नरवणेंना दिला होता. त्यावर सभागृहात बोलण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोदींना आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा डिवचले. ‘जे योग्य वाटेल तेच करा’ असे राहुल गांधी लोकसभेचे कामकाज ठप्प झाल्यानंतर बोलले.





























































