
>> अशोक बेंडखळे
भारतातील अनेक नगराना मोठा इतिहास आहे. गुजरातमधील श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्यामुळे प्रसिद्ध झालेले बडोदे या शहराला जो दैदीप्यमान इतिहास लाभला आहे तो सांगणारे एक छोटे पुस्तक (118 पाने) विनायक स. वाकसकर यांनी लिहिले असून मुंबईच्या दामोदर सावळाराम आणि मंडळीने ते प्रकाशित केले आहे.( इ.स. 1937) महाराज सयाजीरावांच्या देणगीतून हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. प्राचीन, पूर्वकालिन, मध्यकालिन व अर्वाचीन अशा चार भागात ते असून त्यातून खूप मनोरंजक माहिती मिळते.
राष्ट्रकुट कर्क राजाचा एक त्याम्रपट प्रसिद्ध आहे. हा ताम्रपट सन 812 मधील आहे. यात वटपद्रक हे एका गावाचे नाव असून त्याच्या चतुःसीमा वर्णन केल्या आहेत. त्या आजच्या बडोदे शहराशी जुळण्राया आहेत. वटपद्रक-वडोदर- बडोदे अशी नावे बदलली मात्र वटपद्रक हेच या गावाचे मुळचे नाव आणि तेव्हा ते खेडे असावे असे दिसते. एकूण उच्चार करण्यास सोपे म्हणून बडोदे हे नाव प्रचलित झाले.
प्राचीनकाळी सर्व हिंदुस्थानावर राजपुतांचे राज्य होते. नवव्या- दहाव्या शतकापासून वायव्य दिशेकडून मुसलमानांच्या स्व्राया होऊ लागल्या. शेपन्नास वर्षानंतर त्यांनी हिंदुस्थानात कायमचे राज्य करण्याचे प्रयत्न केले. खिलजी, तुघलक आदी पठाण घराण्यांनी पंधराव्या शतकापर्यंत राज्य केले. पुढे गुजरातचा सुभा स्वतंत्र होऊन तो गुजरातचा सुलतान म्हणवू लागला. सुलतानी अंमलात सुलतान बडोद्यास येऊन राहिले व कोट वगैरे बांधून कायमची वस्ती केली.मोगली अमल सुमारे दीडशे वर्षे चालला. 1721 मध्ये मोंगलाना हुसकावून लावण्यात मराठ्याना यश आले. गायकवाड घराण्याकडे गुजरातची सत्ता आल्यानंतर पन्नास वर्षानंतर त्यांनी राजधानी बडोद्यास आणली.
गायकवाड राज्यकर्त्यांनी प्रारंभी सोनगडास तळ ठोकून मराठे शाहीची वृद्धी केली. पुढे पहिले सयाजीराव राज्यारूढ झाले, तेव्हा गायकवाडांची गादी बडोद्यास आली आणि बडोद्याच्या विशेष सुधारणेस तेव्हापासून प्रारंभ झाला. (1768) गणपतराव महाराज 1847मध्ये गादीवर आले. नऊ वर्षात त्यांनी राज्यात आगगाडी आणली तसेच शाळा, कला यंत्रे सडका इ. कामे केली आणि बडोद्याच्या सुधारणांना आणखी पुढे नेले. 1768 पासून शंभर वर्षात बडोद्यात बारा पुरे आणि बारा नाथ मंदिरे यांची निर्मिती झाली. पुढे 1856 मध्ये आलेल्या खंडेराव महाराजांनी शारीरिक शिक्षणाकडे पुष्कळ लक्ष दिले आणि अनेक आखाडे बडोद्यास आले. त्यामुळे बडोद्याचे नाव कुस्तीसाठी प्रसिध्द झाले.
अर्वाचीन या प्रकरणात बडोदे शहराची आधुनिकतेकडे वाटचाल तिसरे सयाजीराव गायकवाड महाराज गादीवर बसल्यावर (1875 ) कशी सुरु झाली त्याची माहिती येते. सरकारी इमारती आणि राजवाडे यांचा अभाव त्यांच्या लक्षात आला. त्यांनी अनेक राजवाडे तसेच बडोद्याची शान लक्ष्मीविलास हा वैभवसंपन्न राजवाडा बांधून घेतला (1891) त्यावेळी हिंदुस्थानात सात- आठशे संस्थांने होती, परंतु या राजवाड्यासारखा सुंदर राजवाडा एकाही संस्थानात नाही असा लौकिक लक्ष्मीविलासला लाभला. या राजवाड्यावर अनेक मनोरे आहेत. तळमजल्यावर मुख्य दिवाणखाना 100 फुट लांब व 50 फुट रुंद असा विस्तीर्ण असून त्यात दरबार भरत असे. दिवाणखाण्यातील एका बाजूस सिंहासन ठेवले असून पहिल्या मजल्यावरील तीन्ही बाजूस प्रेक्षकांना बसण्याची सोय आहे. दिवाणखान्याचा भिंतीचा गुळगुळीतपणा पाहून त्या संगमरवरी असाव्यात असे भासते. राजवाड्यात अनेक चौक व कारंजी असून कचेरी, पुस्तकालय बिलियर्ड, ब्रिज इ. खेळण्याची साधने, प्रशस्त भोजनगृह,पाहुण्यांची राहण्याची सोय आदी व्यवस्था केलेल्या आहेत. सार्वजनिक बागेतील एका बंगल्यात वस्तुसंग्रहालय बनविले आहे. त्यात नामांकित चित्रकलांचे नमुने तसेच दुर्मिळ व प्रेक्षणीय वस्तू ठेवलेल्या आहेत. शिवाय मोर्वी, वांकानेर लक्ष्मी प्रताप आणि महाराजा अशी चार नाट्यगृहे त्यावेळी बांधली होती. तसेच 1936मध्ये विश्वपुस्तकालय (युनिव्हीसिटी लायब्ररी )साठी भव्य इमारत बांधण्यास घेतली होती.
एकूण पूर्वीचे भुईकोट किल्लासारखे शहर त्याठिकाणी विशाल सडका, सुंदर जलाशय चांगली उपवने, गगनचुंबी इमारती ,राजवाड्यांचे वैभव दुतर्फा असलेली वृक्षराजी, लांबवर जाणारे रस्ते अशा रुपातले बडोदे सयाजीराव महाराजांच्या कारकिर्दीत झाले.
श्रीमंत सयाजीराव प्रजाप्रेमी, विद्याप्रेमी ,कलाप्रेमी असे दूर दृष्टीचे दानशूर व्यक्तिमत्त्व होते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांची बडोद्याची राज्यसूत्रे घेताच जाहीरनामा काढला त्यात आमची प्रजा सुखी राहावी कल्याणाची वृद्धी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली तसेच समाजात सामंजस्य रहावे म्हणून हिंदुच्या मंदिरा प्रमाणेच मुसलमानाच्या मशिदींना सरकारमधून भरघोस मदत केली.
एकूण या पुस्तकातून जुन्या बडोदे शहराची मनोरंजक माहिती मिळते तसेच सयाजीराव महाराजांच्या दूरदृष्टीने बडोद्याचे जे रूप पालटले ते कळते.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)























































