पुरुषाने बुरखा घालून महिलांच्या डब्यातून केला प्रवास, पोलिसांकडून गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात बुरखा घालून प्रवास करणाऱ्या एका पुरुषाविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित आरोपी सध्या फरार आहे.

शुक्रवारी दुपारी सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या महिला डब्यात प्रवास करणाऱ्या महिलांना बुरखा घातलेल्या एका प्रवाशाबद्दल संशय आला. त्यांनी त्याला विचारपूस केली असता तो पुरुष असल्याचे उघड झाले.

महिलांनी त्याला महिला डब्यात का चढलात आणि बुरखा का घातला, असा जाब विचारला. काही महिलांनी त्याचा मोबाईलवर व्हिडिओही काढला. पुढील घाटकोपर स्थानकात पोलिसांच्या ताब्यात देण्याची धमकीही त्यांनी दिली. मात्र, गाडी घाटकोपरला पोहोचण्याआधीच त्या व्यक्तीने डब्यातून उडी मारून रुळांवर उतरून पळ काढला. त्यानंतर तो दुसऱ्या फलाटावर जाऊन कर्जतकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढल्याचे समोर आले.

दरम्यान, महिलांनी घाटकोपर स्थानकात उतरून ड्युटीवरील पोलिसांकडे तक्रार दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, मात्र आरोपी कॅमेऱ्यात दिसला नाही. त्यानंतर मुलुंड येथे कर्जत लोकलची तपासणी करण्यात आली, पण तोपर्यंत आरोपी उतरून निघून गेला होता.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने भारतीय रेल्वे कायद्यानुसार महिला डब्यात अनधिकृत प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.