
टी-20 विश्वचषकातील ‘ग्रुप डी’मधील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने आक्रमकतेची ज्वाला पेटवत अफगाणिस्तानला 5 विकेट राखून अक्षरशः चिरडले. चेपॉकवर उभा राहिलेला 182 धावांचा डोंगर किवींनी टीम सायफर्टच्या 65 धावांच्या झंझावाती खेळीमुळे अवघ्या 17.5 षटकांत उद्ध्वस्त करत टी-20 विश्वचषक इतिहासातील आपला सर्वात मोठा यशस्वी पाठलाग नोंदवला.
न्यूझीलंडच्या वादळी विजयाचा कणा ठरला सलामीवीर टीम सायफर्ट. त्याने अफगाण गोलंदाजांवर तुफानी हल्लाबोल करत 7 चौकार आणि 3 षटकार खेचत 65 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. मधल्या फळीत ग्लेन फिलिप्सने 42 धावांचा घणाघात केला, तर मार्प चॅपमन (28) आणि डॅरील मिचेल (ना. 25) यांनी जोरदार खेळ करत न्यूझीलंडच्या विजयी अभियानाचा श्रीगणेशा केला. अफगाण गोलंदाजीत मुजीबूर रहमानने 2 विकेट घेत थोडा प्रतिकार केला. मात्र राशीद खान, मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाह उमरजई यांना प्रत्येकी एकाच विकेटवर समाधान मानावे लागले.
त्याआधी नाणेफेक जिंपून फलंदाजी स्वीकारलेल्या अफगाणिस्तानने 20 षटकांत 6 बाद 182 धावा उभारल्या. गुलबदीन नईबने 63 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी करत डावाला धार दिली. त्याने 4 षटकार आणि 3 चौकार खेचत अफगाणी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. सेदिपुल्लाह अटल (29), रहमानुल्लाह गुरबाज (27) आणि दारवीश रसुली (20) यांनी उपयुक्त साथ दिली. न्यूझीलंडकडून वेगवान लॉकी फर्ग्युसनने 2 विकेट घेत अफगाण फलंदाजीला लगाम घातला. त्याला मॅट हेन्री, रचिन रवींद्र आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी एका विकेटची प्रभावी साथ दिली.
फिलिप्स धावांच्या शर्यतीत तिसरा
ग्लेन फिलिप्सने वैयक्तिक आणि संघासाठी महत्त्वाचे विक्रम नोंदवले. या सामन्यात 42 धावांची आक्रमक खेळी करत फिलिप्सने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या धावांचा आकडा 2147पर्यंत नेला. आज त्याने माजी कर्णधार ब्रॅण्डन मॅकलमला (2140) मागे टाकत न्यूझीलंडसाठी टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये तिसऱया क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. तो आता मार्टीन गप्टील (3531) आणि केन विल्यम्सनच्या (2575) मागे आहे.

























































