एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस, 55 आसनी अत्याधुनिक बसेस रस्त्यावर धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बसेस दाखल होणार आहेत. एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी 55 आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. आकर्षक स्वरूप असलेल्या नव्या बसेसना हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या ‘राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्यात आले आहे.

एसटीच्या ताफ्यातील सध्याच्या बसेसची आसन क्षमता 40 प्रवासी इतकी आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक प्रवाशांना गाडीत उभे राहून प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने नव्या बसेसची रचना करण्यात आली आहे. नव्या बसेसमध्ये 55 प्रवासी आरामात बसू शकणार आहेत. गर्दीच्या मार्गांवर उभे राहणाऱया अतिरिक्त 15 प्रवाशांना बसण्याची सोय उपलब्ध होणार आहे. दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर ‘राजमाता जिजाऊ’ बसेसची सेवा चालवण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून केले जात आहे.

भगव्यापांढऱया रंगाच्या बसेस

3 बाय 2 आसन रचनेच्या 55 आसनी अत्याधुनिक बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राची परंपरा आणि अभिमानाचे प्रतीक मानले जात आहे. एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी आपल्या ताफ्यातील बसेसना गौरवले आहे. त्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बसेसची भर पडणार आहे.