रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला मदतीची फुटकी कवडीही नाही, वन विभागाची गंडवागंडवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रानडुकराच्या हल्यात जखमी झालेल्या मुरबाडमधील एका शेतकऱ्याला वर्ष उलटून गेले तरी मदतीची फुटकी कवडीही मिळाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. विठ्ठल पवार (५६) असे शेतकऱ्याचे नाव – असून उपचाराकरिता लागलेले ५० हजारांचे बिल भरायला टाळाटाळ केली जात आहे. त्यावेळी – वन विभागाने पंचनामा करून वैद्यकीय बिलेही मागवून घेतली होती. मात्र, पवार यांना अद्याप एक रुपया दिला नसल्याने वन विभागाची अशीही गंडवागंडवी समोर आली आहे.

१९ जानेवारी २०२५ रोजी मुरबाडच्या धारगाव येथील शेतकरी विठ्ठल पवार आपल्या शेताकडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्यावर रानडुकराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या पोटावर मोठी जखम झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात तसेच नंतर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. या प्रकरणी सरळगांव वन विभागाने तत्काळ पंचनामा करून पवार यांच्याकडील वैद्यकीय बिलेही मागवून घेतली. मात्र वन विभागाकडून मदत देण्याचा केवळ दिखावा करण्यात आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वर्ष उलटून गेले तरी विठ्ठल पवार या शेतकऱ्याला गंडविण्यात आले असल्याने गावात वन विभागाच्या विरोधात संतापाचे वातावरण पसरले आहे

वन्यप्राणी, मानव यांच्यातील संघर्ष वाढला

शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. मागील वर्षी बांगरवाडी येथील एका तरुणाचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, तर साखरे येथील मारुती पवार हे गंभीर जखमी झाले होते. अशा घटना सातत्याने घडत असतानाही वन विभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. बेकायदेशीर जंगलतोडीमुळे वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. या वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे.