ते मूल माझं नाही; तेज प्रताप यादव यांचा अनुष्कासोबतच्या संबंधांना इन्कार, नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनशक्ती जनता दलचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेज प्रताप यादव सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. तेज प्रताप यादव यांचे नाव त्यांची जुनी सहकारी अनुष्का यादव हिच्याशी जोडले जात आहे. अनुष्का नुकतीच गर्भवती असल्याचे समोर असून ते मूल तेज प्रताप यादव यांचे असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. यावर आता तेज प्रताप यादव यांनी प्रतिक्रिया दिली असून ते मूल माझे नसल्याचे ते म्हणाले.

सोशल मीडियावरील दावे निराधार आणि दिशाभूल करणारे असून ते माझे मूल नाही. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले आहे, असा आरोप तेज प्रताप यादव यांनी केला. माझ्याविरुद्ध कट रचला जात असून काही जयचंद मला बदनाम करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले.

तेज प्रताप यादव यांनी गेल्या वर्षी फेसबुकवर एक भावूक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी अनुष्कासोबतच्या 12 वर्षांच्या संबंधांची कबुली दिली होती. मात्र, नंतर त्यांनी दावा केला की त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले होते आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी फोटो मॉर्फ (एडिट) करण्यात आले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर तेज प्रताप यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि लालू प्रसाद यादव यांनीही त्यांच्याशी संबंध तोडले.

हीच अनुष्का यादव आई होणार असून ते मूल तेज प्रताप यादव यांचे असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. मात्र हा दावा तेज प्रताप यांनी ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी बोलताना फेटाळून लावला. आकाश भाटी अनुष्काच्या संपर्कात असून तोच याचे उत्तर देऊ शकतो, असे तेज प्रताप म्हणाले. अनुष्का यादव हिच्याशी माझा कोणताही संबंध नाही. चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध मी कायदेशीर कारवाई करेन आणि या प्रकरणावर न्यायालयाचे दरवाजे ठोठावेन, असेही ते म्हणाले.

तसेच माजी आमदार मुकेश रोशन हे आपल्या हत्येचा कट रचत असल्याचा खळबळजनक आरोपही तेज प्रताप यांनी केला. तसेच संजय यादव, शक्ती सिंह, सुनील सिंह यांची नावे घेत हे लोक माझी प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असल्याचा दावाही तेज प्रताप यांनी केला. त्यांनी बिहारचे गृहमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे सुरक्षेचीही मागणी केली आहे. गरज पडल्यास याबाबत आपण पंतप्रधान मोदींचीही भेट घेऊ, असेही ते म्हणाले.