
हिंदुस्थानच्या क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२५-२६ या वर्षासाठी खेळाडूंच्या वार्षिक कराराची (Central Contract) नवीन यादी जाहीर केली आहे. या नवीन यादीत मोठे बदल पाहायला मिळत असून, हिंदुस्थानचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा धक्का बसला आहे. हे दोन्ही खेळाडू आता ‘ग्रेड बी’ मध्ये घसरले आहेत.
रोहित-कोहली यांचे डिमोशन
गेल्या वर्षीपर्यंत ‘ए प्लस’ ग्रेडमध्ये असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आता ‘ग्रेड बी’ मध्ये स्थान देण्यात आले आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे हे दोन्ही खेळाडू आता केवळ वनडे (ODI) क्रिकेट खेळत आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांनी आधीच निवृत्ती घेतली आहे, तर मे २०२४ मध्ये त्यांनी कसोटी क्रिकेटलाही अलविदा केले होते.
बीसीसीआयने या वर्षीच्या कंत्राटात ‘ए प्लस’ ही सर्वोच्च श्रेणी पूर्णपणे काढून टाकली आहे. गेल्या वर्षी या श्रेणीत असलेल्या जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना आता ‘ग्रेड ए’ मध्ये स्थान देण्यात आले आहे.
ग्रेड ए: शुभमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या तिघांना या श्रेणीत स्थान मिळाले आहे.
ग्रेड बी: यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव, केएल राहुल, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांच्यासह एकूण ११ खेळाडूंचा समावेश आहे.
ग्रेड सी: रिंकू सिंग, टिळक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांसारख्या १७ खेळाडूंना या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.



























































