
गोलंदाजांच्या अचूक कामगिरीनंतर ब्रायन बेनेटच्या नाबाद 48 धावांच्या जोरावर झिम्बाब्वेने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ओमानवर 8 फलंदाज आणि 39 चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला. या विजयासह झिम्बाब्वेने ‘ब’ गटातून अव्वल स्थानी झेप घेतली. ओमानची आघाडीची फळी कापून काढणारा ब्लेसिंग मुजरबानी या सामन्याचा मानकरी ठरला.
ओमानकडून मिळालेले 104 धावांचे लक्ष्य झिम्बाब्वेने केवळ 13.3 षटकांत 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 106 धावा करीत सहज पूर्ण केले. यात सलामीवीर ब्रायन बेनेटने 36 चेंडूंत 7 चौकारांसह नाबाद 48 धावांची खेळी केली. त्याने तादिवानाशे मारूमणीच्या (21) साथीत 30 धावांची सलामी दिली. मात्र, सुफयान मेहमूदने मारूमणीसह त्याच्या जागेवर आलेला डिऑन मायर्स (0) यांना बाद केले. मात्र, त्यानंतर ब्रेंडन टेलरने 30 चेंडूंत 3 चौकारांसह 31 धावांची खेळी करीत बेनेटला साथ दिली. या दोघांनी 56 चेंडूंत 68 धावांची अभेद्य भागीदारी केली. टेलर रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर आलेल्या कर्णधार सिकंदर रझाने नाबाद 5 धावा करीत बेनेटच्या साथीत झिम्बाब्वेच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ओमानने 19.5 षटकांत 103 अशी असुरक्षित धावसंख्या उभारली. यात मधल्या फळीतील विनायक शुक्लाने सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. सुफयान मेहमूद (25) व नदीम खान (20) हे इतर दुहेरी धावा करणारे फलंदाज ठरले.




























































