
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये चोरट्यांनी चोरीसाठी हायटेक पद्धतीचा अवलंब केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतून आलेल्या एका सराईत टोळीने गुगल मॅपचा (Google Maps) वापर करून शहरातील पॉश (उच्चभ्रू परिसर) शोधले आणि एका बंगल्यातून 25 लाख रुपयांच्या रोकडीसह लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. या टोळीने गुन्ह्यासाठी वापरलेल्या कारवर दिल्लीतून चोरलेली बनावट नंबर प्लेट लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 28 जानेवारीला जयपूरच्या सी-स्कीम भागातील भागीरथ कॉलनीमध्ये घडली. ज्वेलरी व्यावसायिक रचना सबीखी यांचे कुटुंब तीन तासांसाठी घराबाहेर गेले असताना, चोरट्यांनी बंद घराची रेकी करून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सुमारे तीन तास घरात थांबून कपाटातील 25 लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन फरार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने गुगल मॅपवर शहरातील श्रीमंत वस्त्या शोधल्या होत्या. तिथे गेल्यावर ज्या घरांना कुलूप आहे किंवा जिथे लोक बाहेर गेले आहेत, अशा घरांची त्यांनी निवड केली. चोरी करण्यासाठी ही टोळी खास दिल्लीहून जयपूरला कारने आली होती. त्यांच्या कौशल्याचा वापर करून त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध रित्या या चोरीचा कट रचला होता.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जयपूर पोलिसांनी 500हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये एक संशयास्पद कार आढळून आली, जिच्या नंबर प्लेटचा तपास केला असता ती दिल्लीतून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. सायबर सेल आणि जिल्हा विशेष पथकाने तांत्रिक पाळत ठेवून दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून या टोळीच्या दोन सदस्यांना अटक केली आहे.

























































