
मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. मागील दहा महिन्यांत तिकीट तपासणी पथकांनी 34.34 लाख प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले. त्यांच्याकडून 203.76 कोटी रुपये दंड वसूल केला. याच अवधीत मुंबई विभागातील लोकल ट्रेनमध्ये 9.49 लाख फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करून 27.39 कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली.
मध्य रेल्वेच्या समर्पित तिकीट तपासणी पथकांनी मुंबईसह इतर विभागांमध्ये एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान ही कारवाई केली. या अवधीत हाती लागलेल्या फुकटय़ा प्रवाशांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत 9.8 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षी 31.28 लाख विनातिकीट प्रवाशांना पकडले व त्यांच्याकडून एकूण 167.61 कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता. यंदाच्या जानेवारीत अवैध प्रवास करणाऱया 3.58 लाख प्रवाशांना अटक करण्यात आली. उपनगरी रेल्वेच्या मार्गावर मागील दहा महिन्यांत 9.49 लाख विनातिकीट प्रवाशांकडून 27.39 कोटी रुपयांचा दंड वसूल केला गेला.





























































