
मराठी रंगभूमीला आजही जिवंत ठेवणारी गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे काळाशी संवाद साधणारी आणि रंगभूमीवर वेगळे प्रयोग करू पाहणारी नवी नाटके. ‘लग्नपंचमी’ हे असेच एक नाटक आहे, जे विनोदाच्या आडून आजच्या मध्यमवर्गीय वैवाहिक वास्तवावर नेमके बोट ठेवते. लग्नानंतरच्या गंमती-जमती आणि जोडप्यांच्या आयुष्यातील मजेदार प्रसंगांतून उलगडत जाणारे हे नाटक आपल्याला आपल्याच नात्यांकडे सजगपणे बघण्याची दृष्टी देते. नाटक, चित्रपट, मालिका आणि ओटीटी अशा सर्व माध्यमांचा दांडगा अनुभव असलेल्या प्रथितयश कलाकारांच्या एकत्र येण्यातून उभे राहिलेले हे नाटक केवळ मनोरंजन न करता प्रेक्षकाला स्वतःच्या नात्याचा विचार करायला भाग पाडते.
सात्विक आणि सूर्यजा हे लग्नबंधनात अक्षरशः अडकलेले एक मध्यमवर्गीय जोडपं. सात्विक दैनंदिन टीव्ही मालिकांचा लेखक आहे, जो सतत टीआरपी, कारस्थानं, चॅनेलच्या अपेक्षा आणि वेळेच्या दबावाखाली जगतोय. तर सूर्यजा एका खासगी कंपनीत नोकरी करतेय, जिथे सध्याच्या काळातील कॉर्पोरेट आव्हाने तिच्यासमोर आहेत. या कामाच्या धावपळीत त्यांचे वैवाहिक आयुष्य, नातेसंबंध आणि संवाद हळूहळू विस्कटत चालले आहेत. एका भन्नाट आणि अनपेक्षित फँटसी प्रसंगाने नाटकाची सुरुवात होते, जो नाटकाचा टोन सेट करतो. आपल्या वैवाहिक जीवनातील ताणतणाव, विरोधाभास आणि विसंवाद यांकडे विनोदाच्या चष्म्यातून पाहायला लावणारी ही एक दर्जेदार ‘कॉमेडी’ आहे. ‘लग्नपंचमी’ या शीर्षकातूनच नाटक एक खोडकर प्रश्न उपस्थित करतं- लग्न म्हणजे नेमका उत्सव आहे की रोजचा संघर्ष? या भांडणांमुळे त्यांना लग्न मोडायचेही आहे आणि जुन्या प्रेमामुळे ते टिकवायचेही आहे. अशा विचित्र पेचात सापडलेल्या या जोडप्याची गोष्ट पाहताना आपण आपल्याच आयुष्यात डोकावतोय असं वाटायला लावणं हे या नाटकाचं वैशिष्टय आहे.
ह्या नाटकात अनेक प्रसंग आणि पात्रं आहेत. मुख्य नायक – नायिकेभोवती हे नाटक फिरत असलं तरीही सात्विकची बॉस असलेली शालिनी, गंमतीदार प्रसंगात दिसणारा यम, सात्विकचे आईबाबा, मॅरेज काऊंसेलर, घटस्पह्ट फेम वकील अशी अनेक पात्रं त्यांना हा तिढा सोडवायला मदत करतात आणि विनोदाच्या आवरणाखाली जीवनाचं अवघड तत्वज्ञान साधेपणानं मांडून जातात. लग्नानंतरच्या अडचणी आणि संघर्ष दाखवताना पुठेही आक्रस्ताळेपणा न करता भावनांचा खरेपणा आणि नात्यांमधली अगतिकता एकाचवेळी अधोरेखित करत हे नाटक पुढे जातं. मधुगंधा पुलकर्णी यांचं लेखन आणि निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन ही ‘लग्नपंचमी’ची खरी ताकद आहे. हे नाटक मुळात नाटक म्हणूनच लिहिलं गेलं आहे, हे प्रत्येक प्रसंगातून जाणवतं. संवादप्रधान रचना, शब्दनिष्ठ विनोद, रंगमंचावरच फुलणारे प्रसंग आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधणारी मांडणी यामुळे हे संपूर्णपणे रंगभूमीचं नाटक आहे.
स्वप्निल जोशीने साकारलेला नायक अतिशय संयत आणि समजूतदार आहे. तब्बल एका तपानंतर रंगभूमीवर पुनरागमन करताना स्वप्निलचा अभिनय प्रगल्भ वाटतो. त्याचा वावर, संवादफेक आणि भावनिक चढउतार रंगमंचावर नैसर्गिकपणे उलगडत जातात. अमृता खानविलकरचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक असलं, तरी ती पुठेही नवखी वाटत नाही. सुरुवातीच्या प्रसंगांतील तिचा सावधपणा नंतर आत्मविश्वासात बदलतो आणि तिची भूमिका रंगत जाते. नाटकातील तिची उपस्थिती, कथेला आवश्यक असा भावनिक आधार देते. विशेष उल्लेख करायचा तो मधुगंधा पुलकर्णी आणि सुनील अभ्यंकर यांचा. त्या दोघांचा सहजसुंदर वावर आणि विनोदाचं अचूक टायमिंग नाटकाला वेगळी उंची मिळवून देतं. निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन विशेष उल्लेखनीय आहे. नाटकात प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य, विनोदाचा अपेक्षित वापर आणि प्रसंगांची लय त्यांनी उत्तम साधली आहे. संपूर्ण नाटक विनोदी धाटणीचं असलं, तरी दोन प्रसंग असे आहेत जे प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणतात. हा विरोधाभासच नाटक अधिक प्रभावी करतो.
‘लग्नपंचमी’ हे नाटक मोठे सामाजिक भाष्य करत नाही, पण छोटया-छोटया दैनंदिन गोष्टींतून आजच्या वैवाहिक नात्यांची गुंतागुंत उलगडते. नाटक पाहताना प्रेक्षक कधी खळखळून हसतो, तर कधी अंतर्मुख होतो आणि शेवटी स्वतःच्या नात्यांकडे थोडया वेगळ्या नजरेने पाहू लागतो, हीच या नाटकाची खरी कमाई आहे. मराठी रंगभूमीवर आजही आशयपूर्ण, खुसखुशीत आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधणारी नाटपं येतायत, याचा सुखद प्रत्यय ‘लग्नपंचमी’ देतं. केवळ करमणूक नाही, तर असा सर्वंकष अनुभव देणारा हा प्रयोग अगदी जरूर पाहावा असा आहे.
लेखनः मधुगंधा पुलकर्णी
दिग्दर्शनः निपुण धर्माधिकारी
प्रमुख कलाकारः स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, मधुगंधा पुलकर्णी, सुनील अभ्यंकर
निर्मितीः स्वप्नगंधामृत
सूत्रधारः नितीन नाईक


























































