
‘सुरुवातीला तुम्ही दारू पिता. त्यानंतर दारू आणखी दारूची ओढ लावते आणि शेवटी ती दारूच तुम्हाला संपवून टाकते.’ अमेरिकन कादंबरीकार एफ. स्कॉट फिट्झगेराल्ड यांच्या या प्रसिद्ध वाक्याचा दाखला देत मुंबई उच्च न्यायालयाने एका मद्यपीला झापले. अल्कोहोलमुळे आयुष्य उद्ध्वस्त होते, कौटुंबिक विघटन आणि करिअरमधील अडथळे याला दारूच जबाबदार असते असे सुनावत, भरपाईची मागणी करणाऱ्या मद्यपीची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली.
मुंबईतील ‘बॉम्बे हॉस्पिटल’मध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करणाऱया एका व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. 10 मार्च 2001 च्या मध्यरात्री मरीन लाइन्स स्थानकावर ट्रेनची वाट पाहत असताना चालत्या ट्रेनचा फटका बसून तो जखमी झाला होता. 2014 मध्ये रेल्वे दावा न्यायाधिकरणाने त्याला नुकसानभरपाई देण्यास नकार दिला. या निर्णयाला त्याने हायकोर्टात आव्हान दिले. या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. वैद्यकीय अहवालात रुग्णाने मोठय़ा प्रमाणात मद्यपान केले होते असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते याची दखल घेत उच्च न्यायालयाने 2014 साली रेल्वे ट्रिब्युनलने दिलेला निकाल कायम ठेवला आणि अर्जदाराची याचिका फेटाळून लावली.
न्यायालयाचे निरीक्षण काय?
– मद्य सर्वकाही उद्ध्वस्त करते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य, नातेसंबंध, कौटुंबिक कलह आणि सामाजिक प्रतिष्ठा यावर त्याचे गंभीर परिणाम होतात.
– रेल्वे कायदा कलम 124-अ नुसार, जर एखादी व्यक्ती नशेत असेल आणि त्यामुळे अपघात झाला असेल तर ती व्यक्ती
नुकसानभरपाई मिळण्यास पात्र ठरत नाही.
– अपघातावेळी अर्जदाराने मोठय़ा प्रमाणात मद्यपान केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले होते. इतक्या नशेत असताना
प्लॅटफॉर्मच्या अगदी कडेला उभे राहणे ही ‘दुर्दैवी घटना’ नसून स्वतःहून ओढवून घेतलेली जोखीम आहे.
























































