चार्टर विमानांचे ‘स्पेशल ऑडिट’ होणार, डीजीसीएने दिले आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर खासगी चार्टर विमानांच्या देखभालीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चार्टर कंपन्याच्या विमानांचे स्पेशल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहे. विशेष पथके स्थापन करून हे ऑडिट केले जाणार असून पथकांना 25 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

खासगी चार्टर विमानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, विमान अपघात घडत आहेत. अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताने चार्टर विमानांच्या देखभालीचे गंभीर वास्तव उजेडात आणले आहे. भविष्यातील दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने डीजीसीएने स्पेशल ऑडिटचे पाऊल उचलले आहे. विमानांच्या तांत्रिक स्थितीचा आढावा या माध्यमातून घेण्यात येणार आहे. चार्टर विमानांची नियमित देखभाल केली जाते का? इंजिन तसेच इतर तांत्रिक यंत्रणांची कार्यक्षमता सुस्थितीत आहे का? नियमित तांत्रिक तपासणीच्या नोंदी अद्ययावत आहेत का? उड्डाणापूर्वी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाते का? असे महत्त्वाचे मुद्दे स्पेशल ऑडिटमध्ये गांभीर्याने विचारात घेण्यात येणार आहेत. स्पेशल ऑडिटचा अहवाल याच महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 25 फेब्रुवारीपर्यंत पुढे येणार आहे. त्यात खासगी चार्टर कंपन्याची बेफिकिरी चव्हाटय़ावर येणार आहे.

‘व्हीआरएस व्हेन्चर’ला पहिल्या टप्प्यात वगळले!

स्पेशल ऑडिटच्या पहिल्या टप्प्यात 14 चार्टर विमान कंपन्याचा समावेश केला आहे. त्या कंपन्याच्या यादीत अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ‘व्हीआरएस व्हेन्चर’चे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्पेशल ऑडिटमध्ये ’व्हीआरएस व्हेन्चर’चे नाव प्राधान्याने घेणे अपेक्षित होते. या पंपनीला पहिल्या टप्प्यात अंतर्भूत का केले नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

पहिल्या टप्प्यातील 14 पंपन्या

डीजीसीएने एअर चार्टर सर्व्हिसेस, एआर एअरवेज, एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर, चिप्सन एव्हिएशन, डेक्कन चार्टर, ग्लोबल व्हेक्ट्रा हेलिकाॅर्प, इन्डो-पॅसिफीक एव्हिएशन, इंडिया फ्लाय सेफ एव्हिएशन, कर्णावती एव्हिएशन, पवन हंस, राजस एरोस्पोर्टस्, रेडबर्ड एअरवेज, रिलायन्स कमर्शियल डिलर्स, इझेस्ट एव्हिएशन या कंपन्याचे स्पेशल अडिट करण्याचे आदेश दिले आहेत.