
मुंबई उपनगरातील वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. एका तासाच्या प्रवासाला तीन-तीन तास लागत आहेत. या गंभीर समस्येकडे शिवसेना नेते व मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी एमएमआरडीए येथे पालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत लक्ष वेधले. दिंडोशी मतदारसंघातील रस्ते, पूल, आरोग्य सुविधा याबाबत समस्याही प्रभू यांनी बैठकीत मांडल्या.
पालकमंत्री आशीष शेलार यांनी ही बैठक घेतली. जिल्हाधिकाऱयांसह विभागीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. कोस्टल रोड ते दिंडोशी दरम्यान बांधण्यात येणाऱया पुलाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात यावी. या पुलाखालून पादचारी भुयारी मार्ग करावा, फिल्म सिटी ते मुलुंड लिंक रोडवर दिंडोशीत होणारी ट्राफिक समस्या सोडवावी, अशा मागण्यात बैठकीत करण्यात आल्या.
वांद्रे ते गोरेगाव प्रवास करणाऱयांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतूककोंडीमुळे या प्रवासासाठी तीन तीन तास लागतात. गोरेगाव येथील ओबेरॉय मॉल ते नागरी निवारा या प्रवासालादेखील किमान एक तास लागतो. याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सुनील प्रभू यांनी बैठकीत केली.
बैठकीतील मागण्या
– पाळीव प्राण्यांसाठी गार्डन तयार करावे व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फिरती ऍम्बुलन्स सरकारी योजनेअंतर्गत द्यावी. प्रभागनिहाय विद्युत दाहिनी अथवा दफनभूमी तयार करण्यात यावी. z रत्नागिरी हॉटेल ते कांदिवली या दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करावे. संस्कार धाम ते जीजी माळकरी रोड तसेच आप्पा पाडा ते लोखंडवाला रस्ता करावा. z नागरी निवारा येथे प्रसूतिगृह व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावे. z स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र बंद अवस्थेत आहे. ते सुरू करावे. z आप्पा पाडा येथील डायग्नोसिस सेंटर अद्ययावत करावे.
– रस्त्यालगतच्या पात्र लोकांना दवनार येथे घरे मिळतील असे परिपत्रक एमएमआरडीएने काढले आहे; परंतु तिथे लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे. याबाबत मेधा पाटकर यांनी आंदोलनही केले होते. ही गंभीर बाब पाहता परिपत्रक तत्काळ रद्द करावे व पात्र कुटुंबांना नियमानुसार दोन किलोमीटरच्या अंतरावर घर द्यावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.



























































