
बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करून १ कोटी २४ लाख ६९ हजार १२१ रुपयांचे अनुदान हडप केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी सुमारे २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागाचे माजी अध्यक्ष नितीन उपासनी, रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद चिटणीस मिलिंद पाटील, तत्कालीन प्राचार्य अनिल पाटील, विद्यमान प्राचार्या सोनाली पाटील आदींचा समावेश आहे.
बोगस शालार्थ आयडी तयार करून अनेक संस्थांनी आणि अधिकाऱ्यांनी राज्यात मोठा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे शासनाने या शालार्थ आयडींची कसून चौकशी सुरू केली आहे. याच चौकशीमध्ये अलिबाग येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी दोषी असल्याचे आढळून आले आहे. शेखर कुलकर्णी यांची पत्नी गायत्री कुलकर्णी ही डोंबिवली येथील सारस्वत कॉलनीमधील सखाराम वामन जोशी हायस्कूलमध्ये सहशिक्षिका म्हणून काम करीत नव्हत्या. तरीही त्यांची नियुक्ती दाखवण्यात आली असून कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार शालेय संस्था आणि विभागीय शिक्षण मंडळ यांच्या संगनमताने झाला आहे. त्यामुळे वाशी विभागीय मंडळाचे राजेंद्र अहिरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार वाशी पोलिसांनी सुमारे २० आरोपींचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
शेखर कुलकर्णी याने केलेला हा कारनामा शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष नितीन उपासनी यांच्या आशीर्वादाने घडला आहे. उपासनी यांच्याच कार्यकालात शालार्थ ड्राफ्ट सोडण्यात आला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आरोपींमध्ये शिक्षिका मयुरी पाटील, शिक्षक जयेश पाटील, स्वप्नील पाटील, वैभव गोसावी, संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील, माजी प्राचार्य एन. बी. पवार, एन. रामास्वामी, डी. पी. हरीदास, एन. बी. खानविलकर, डी. पी. गायकवाड, प्राची नलावडे, दिनेश गुरव, शेखर कुलकर्णी, गायत्री कुलकर्णी यांचा समावेश आहे.


























































