
वाढीव भाड्याच्या वादातून रिक्षाचालकाने ६२ वर्षीय वृद्ध महिलेला ढकलून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझा परिसरात हा प्रकार घडला. यामध्ये वृद्धेच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून मानपाडा पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. रिक्षाचालकांच्या दादागिरीविरोधात शहरवासीयांनी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रिजा जोसेफ (६२) असे जखमी वृद्धेचे नाव असून त्या विक्रोळी येथे वास्तव्यास आहेत. डोंबिवलीतील दावडी भागातील आपले घर त्यांनी भाड्याने दिले आहे. भाडेकराराचा दस्तऐवज करण्यासाठी त्या बुधवारी भाडेकरू लालती पटेल आणि त्यांच्या नातेवाईकांसह कस्तुरी प्लाझा येथे आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर पुन्हा दावडी येथे जात असताना रिक्षाचालकाने सुरुवातीला १२० रुपये भाडे सांगितले होते. मात्र दावडी येथे पोहोचल्यानंतर त्याने वाढीव ४० रुपये मागत एकूण १६० रुपये घेतले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी लालती पटेल यांचा मुलगा वृषभ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांना मारहाण केली. वृषभ यांच्या बचावासाठी मध्ये पडलेल्या रिजा जोसेफ यांना चालकाने जोराचा धक्का दिला. त्यामुळे त्या रस्त्यावर पडून त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
रुग्णालयात उपचार सुरू
जखमी रिजा जोसेफ दावडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवला. याप्रकरणी संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


























































