
तेलंगणा राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत 423 नगरपालिका वॉर्डांचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेसने 224 वॉर्डांमध्ये विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ 37 जागा मिळाल्या आहेत. भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) 131 जागा जिंकल्या आहेत.
राज्यातील 116 नगरपालिका आणि 7 महानगरपालिकांसाठी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी राज्यभरातील 123 केंद्रांवर सुरू आहे. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस, विरोधी भाजप आणि बीआरएस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. या निकालांमुळे राज्यात कोणत्या पक्षाची लाट आहे, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे मतदान झाल्यामुळे मतमोजणीस अधिक वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वप्रथम टपाल मतपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात आली. मतमोजणी केंद्रांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 12,000 पोलिस कर्मचारी आणि रॅपिड अॅक्शन टीम तैनात करण्यात आली आहे.
मतमोजणी कक्षात केवळ मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक, उमेदवार आणि त्यांचे निवडणूक व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्व मतमोजणी केंद्रांबाहेर आणि स्ट्राँग रूमजवळ वेबकास्टिंगची व्यवस्था केल्याचे सांगितले. या निवडणुकीत 73 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
राज्यातील एकूण 2,996 वॉर्डांपैकी 1,728 वॉर्डांचे निकाल अधिकृतपणे जाहीर झाले आहेत. त्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून काँग्रेसने 923 वॉर्ड जिंकले आहेत. बीआरएसने 481, भाजपने 156, एआयएमआयएमने 30 वॉर्ड जिंकले आहेत. सीपीआय (मार्क्सवादी) पक्षाला 7 जागा मिळाल्या. इतर पक्षांनी मिळून 24 वॉर्ड जिंकले, तर अपक्ष उमेदवारांनी 105 जागांवर विजय मिळवला.
काँग्रेसच्या सूत्रांनुसार, मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी 12 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तसेच पक्षनेते राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी शहरी निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले निकाल मिळतील, असा विश्वास व्यक्त केला होता.



























































